

Nanded Hingoli Highway Blocked
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातून नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावाविरोधात परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि.१६) कांडली फाटा येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करत शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध करत शासनाला इशारा दिला.
आज सकाळी ११ ते १२ या वेळेत नांदेड-हिंगोली महामार्गावर परिसरातील शेतकरी व सर्वपक्षीय नेत्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती.
महामार्गामुळे सुपीक शेती नष्ट होणार असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जमीन संपादन होऊ देणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. आंदोलनादरम्यान शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नेते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत त्यांनी महामार्गाचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. शेतकरी हिताला बाधा पोहोचविणारे निर्णय सरकारने मागे घ्यावेत, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कांडली फाटा परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नसून आंदोलन शांततेत पार पडले.
आंदोलनाच्या शेवटी शेतकरी प्रतिनिधींनी महसूल अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव तातडीने रद्द करण्याची मागणी केली. अन्यथा भविष्यात अधिक व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला.