

सांगली : गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी रविवारी सात दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहर परिसरातील ११४ लहान-मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुकीने गणेशाला निरोप दिला. घाटावर आरती झाल्यानंतर विसर्जन करण्यात येत होते.
महापालिकेच्या वतीने कृत्रिम जलकुंड, मूर्तीदान केंद्र व निर्माल्य संकलन करण्यात येत होते. काही स्वयंसेवी संस्थाही या ठिकाणी सेवा देत होत्या. बाप्पाच्या विसर्जनासाठी सकाळपासूनच येथील सरकारी घाट आणि स्वामी समर्थ घाटावर गणेशभक्तांनी गर्दी केली होती. सायंकाळनंतर सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका सुरू होत्या.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम जलकुंडांमध्ये सहाव्या दिवसाअखेर १३ हजार ५०३ श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत ९८२ मूर्तींचे दान करण्यात आले असून, ३३ टनांपेक्षा जास्त निर्माल्य संकलित करण्यात आले आहे.
महापालिकेच्या वतीने चारही प्रभागांमध्ये उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडांत नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. यामध्ये दीड दिवसाच्या ५०६, पाचव्या दिवशी ५ हजार ३९६, तर सहाव्या दिवशी ७ हजार ६०१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मूर्ती दानालाही नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून दीड दिवसाच्या वेळी २१, पाचव्या दिवशी १९७, तर सहाव्या दिवशी ७५४ अशा एकूण ९८२ भाविकांनी मूर्ती दान केल्या आहेत. महापालिकेच्या संकलन केंद्रांवर एकूण ३३.३०४ टन निर्माल्य जमा झाले आहे. यामध्ये दीड दिवसाच्या वेळी ४.११ टन, पाचव्या दिवशी ८.११ टन, तर सहाव्या दिवशी सर्वाधिक २१.१७५ टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले.