सांगली /कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर, सांगलीसह कोकणात बुधवारीही मुसळधार पावसाने हजेरी लावली. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकांना तसेच व्यावसायिकांनाही त्याचा मोठा फटका बसला. कोकणात पावसामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सातारा जिल्ह्यात हलक्या सरी कोसळल्या.
सांगलीतील उपनगरांमध्ये पावसाने दाणादाण उडाली. शामरावनगरमधील देवेंद्र सोसायटी, समता कॉलनी, संजयनगर परिसरातील दडगे प्लॉट, राजनगर तसेच चिंतामणीनगर येथे शंभरांवर घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.
जिल्ह्यात ऐन हंगामातच पावसाने हजेरी लावल्याने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उभे भातपीक आडवे पडल्याने हे पीक कुजण्याची भीती व्यक्त होत आहे.
बुधवारी सकाळी जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. माण-खटाव या दुष्काळी पट्ट्यातही पावसाने हजेरी लावली.