

विटा : लोकशाही मानत असाल, तर या विभागातून जनतेच्या मतांवर निवडून आलेल्या सर्व आमदार-खासदारांनी येथे येऊन शक्तिपीठ महामार्गाला माझा पाठिंबा आहे, असे सांगावे, मग आम्ही काय करायचे ते ठरवू; मात्र सरकारने प्रशासनाला पुढे करून काही करू नये, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
राज्य शासनाच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध करण्यासाठी राजू शेट्टी माहुली (ता. खानापूर) येथे सकाळी सव्वाआठ वाजल्यापासून ठाण मांडून बसले होते. यावेळी ते म्हणाले, प्रांताधिकारी वारंवार आम्हाला आमचे काम करूद्या, मोजणी करूद्या, असे सांगत होते; लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारचा आदेश आम्हाला पाळावा लागेल, असे ते म्हणाले. त्यावर मी त्यांना सांगितले की, आम्ही येथे शक्तिपीठ महामार्ग नको, असे लोकशाही मार्गाने सांगत आहोत, मात्र तुम्ही ऐकतच नाही. जर तुम्ही खरोखरच लोकशाही मानत असाल, तर या भागातून लोकांच्या मतांवर निवडून आलेल्या आमदार व खासदारांनी येथे येऊन या महामार्गाला माझा पाठिंबा आहे, असे सांगावे; मग आम्ही ठरवू काय करायचे ते. मात्र सरकारने शिखंडीप्रमाणे प्रशासनाला पुढे करून काही करू नये, याला आमचा सक्त विरोध राहील.
राजू शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्गामुळे १३ जिल्ह्यांतील सुमारे २० हजार एकर बागायती जमीन बाधित होणार असून, सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना पूरस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा महामार्ग आम्हाला नको, ही भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट आहे. नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग नुकताच चौपदरी करण्यात आला असून, त्याचा वापर सध्या क्षमतेच्या केवळ २५ टक्के होत आहे. अशा स्थितीत त्याला समांतर नांदेड ते कोल्हापूरदरम्यान दुसरा महामार्ग उभारण्याची गरज काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
प्रकल्पाच्या खर्चावर बोट ठेवताना शेट्टी म्हणाले, मूळ ४५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प एक लाख १० हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आला आहे. या वाढीव खर्चातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. या महामार्गामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील उसाच्या उत्पादनात २५ लाख टनांनी, तर दूध उत्पादनात दररोज सात लाख लिटरने घट होईल. बेरोजगारी आणि घटती उत्पादकता यांचा सामना करणाऱ्या राज्यात शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेऊन सरकारला नेमके काय साधायचे आहे, असा सवालही त्यांनी केला.
भूसंपादनाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गासाठी गटनिहाय दर अद्याप जाहीर केलेले नाहीत. शेतकऱ्यांना नेमकी किती भरपाई मिळणार हे स्पष्ट न करता पालखी मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे भरपाई मिळेल, अशी चर्चा घडवून दिशाभूल केली जात आहे. राज्य सरकारने भूसंपादन कायद्यात केलेल्या दुरुस्तीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई मिळणार नाही. मुळात ज्या गावाला जायचेच नाही, त्या गावचा रस्ता कशाला विचारायचा. आम्हाला कोणतीही किंमत देऊन जमिनी द्यायच्या नाहीत. शेतकऱ्यांच्या जमिनी, शेती आणि शेतीपूरक उद्योगांचे नुकसान करणारा हा प्रकल्प आम्हाला मान्य नाही. लोकशाहीत विरोध करण्याचा आणि आपले मत मांडण्याचा अधिकार जनतेला असून, हे सर्वेक्षण होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा राजू शेट्टी यांनी दिला.