
Jayshree Patil BJP Sangli Politics:
मुंबई : वसंतदादा पाटील यांची नातसून जयश्री पाटील या बुधवारी भाजप प्रवेश करणार असतानाच दुसरीकडे भाजपमधील खदखद आता समोर येत आहे. जयश्री पाटील यांना पक्षात घेवू नका असा निरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी पाठवण्यात आला आहे. असे निरोप कोणी पाठवले, यावर सांगलीतल्या राजकारणात तर्कवितर्क लढवले जात आहे.
भाजपकडून महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असून स्थानिक पातळवरील वजनदार नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. जयश्री पाटील यांच्या पक्षप्रवेशासाठी अजित पवार आणि भाजप दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर सोमवारी त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला आहे. एकीकडे जयश्री पाटील यांच्या प्रवेशाची पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात चर्चा होत असली तरी दुसरीकडे भाजपमधील निष्ठावंतांची खदखदही वाढत आहे. ‘बँक घोटाळ्यातून स्वत:ला आणि दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी जयश्री पाटील प्रवेश करीत आहेत ,त्यांना घेवू नका’, असे निरोप मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगली परिसरातून देण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. आता देवेंद्र फडणवीस याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुधाकर बडगुजर यांनाही विरोध
भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक पातळीवरील मोठ्या नेत्यांसाठी भाजपकडून 'रेड कार्पेट' टाकण्यात आले असून त्यांना पक्षात प्रवेश दिला जातोय. नाशिकमधील उद्धव ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेशही याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. बडगुजर यांच्या प्रवेशाला भाजपच्या स्थानिक आमदार सीमा हिरे यांचा विरोध आहे. नाशिकमधील भाजपच्या निष्ठावतांनी यासाठी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांशीही संपर्क साधल्याची चर्चा होती. बेरजेचं राजकारण ही भाजपची गरज असली तरी आगामी काळात निष्ठावतांना डावलून बाहेरच्यांना पक्षात घेणं हे फायद्याचं की तोट्याचं हे समजेल.