

मुंबई : एकेकाळचे अंडरवर्ल्ड डॉन आणि आता राजकारणात सक्रिय असलेले अरुण गवळी यांची कन्या व माजी नगरसेविका गीता गवळी या भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची त्यांनी आज (दि.१५) भेट घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, गीता गवळी भाजपमध्ये प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गीता गवळी यांनी यापूर्वी शिवसेनेशी जवळीक साधली होती. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्या तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होत्या आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शिवसेनेने मनोज जामसूतकर यांना उमेदवारी देत त्यांना निवडून आणले. याच कारणामुळे गीता गवळी नाराज असल्याचे आणि आता त्या भाजपसोबत जाण्याचा विचार करत असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासोबत झालेल्या भेटीचा तपशील अद्याप समोर आलेला नसला तरी, या भेटीमुळे मुंबईच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गीता गवळी यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे पक्षाला मुंबईत, विशेषतः त्यांच्या प्रभावक्षेत्रात, कितपत फायदा होईल हे येणारा काळच ठरवेल. सध्या तरी या भेटीने राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आणले आहे.