

नंदू गुरव
सांगली लोकसभेचं वारं घुमायला लागलं. मनी-मसल्सच्या जोरावर अखेर 20 उमेदवार रिंगणात थांबले. 2025 चा सारा मे महिना राजकारणानं धुमसत राहिला. शेवटी संजय पाटील विरुध्द विशाल पाटील यांच्यातच जोरदार लढत झाली. 8 मे रोजी मतदान झालं. मुसळधार पाऊस सुरूच होता. पावसासोबत मतांचाही पाऊस झाला आणि विशाल पाटील सांगलीचे खासदार झाले. बालेकिल्ला रिचार्ज झाला. आमदार विश्वजित कदम यांच्यासोबत दिल्लीत जाऊन त्यांनी विनाअट काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. आजपर्यंत त्यांना भाजपकडून ऑफर आहेतच आणि मी काँग्रेसचाच, असं ते सांगत आहेतच. त्यांच्या विजयानं रिचार्ज झालेली जिल्ह्याची काँग्रेस तशीच ठेवणे मात्र कुठल्या नेत्यांना जमले नाही. त्याचा परिणाम त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये दिसला.
अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम केला. त्यांना थोपवण्याचा कसलाही प्रयत्न पक्षानं किंवा नेतृत्वानं केला नाही. कार्यकर्ते पक्ष सोडून का जात आहेत, याची साधी विचारपूसही केली नाही, की कार्यकर्ते गेल्याचा पश्चातापही दाखवला नाही. गेले तर गेले... अशा विचित्र मानसिकतेत शहर आणि जिल्हा काँग्रेस राहिली. अजूनही ती त्याच मानसिकतेत आहे. गेले ते गेलेच, पण जे राहिलेत त्यांना तरी सांभाळले पाहिजे, याचा एकत्रित विचार होतानाही दिसत नाही. निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्याला पक्षात आपलं भवितव्य दिसत नाही, हे एकशे अंशी अंशात झालेलं परिवर्तन विचार करायला लावणारं आहे, याचा विचारच नेतृत्वाने केला नाही.
शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजपवासी झाले. विश्वासघात झाल्यानं काँग्रेस सोडल्याचं म्हणत त्यांनी भाजपचं कमळ हातात घेतलं. भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना अद्याप कोणतंही पद मिळालं नाही, की अधिकार. काँग्रेस नेत्या जयश्री पाटीलही भाजपवासी झाल्या. दोन नेते भाजपमध्ये गेल्यानंतर पक्षात पोकळी निर्माण झाली. त्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष निवडायला डिसेंबर महिना उजाडला. तोवर नगरपालिकेच्या निवडणुका होऊन गेल्या होत्या आणि महापालिकेची निवडणूक ऐन खिंडीत आली होती. भाजप आणि मित्रपक्षांकडून उमेदवार जाहीर होत असताना दुसर्या बाजूला शहर काँग्रेस आणि नेते आपापल्या व्यापात अडकून होते. अखेर आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांचा सत्कार करून, लढा... आम्ही आहोतच असं सांगितलं.
दरम्यान, नगरपालिकेच्या निवडणुकाही झाल्या. 8 नगरपरिषदांसाठी 3 डिसेंबरला जोरदार मतदान झालं. 21 तारखेला निकाल जाहीर झाला. आमदार विश्वजित कदम यांनी पलूसचा गड राखला, तर तिकडं जतमध्ये माजी आमदार विक्रम सावंत यांच्या हातातून गड निसटला. काँग्रेस नेतृत्वाला त्यांच्या त्यांच्या शहरातच अडकवून ठेवण्यात विरोधक यशस्वी झाले. इतर नगरपालिकांमध्ये काँग्रेस होती पण आणि नव्हती पण.
आता सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि त्याची मदार आ. विश्वजित कदम यांच्यावर असल्याचे खासदार विशाल पाटील यांनी जाहीर केले आहे. आम्ही एकजीव आहोत, आमच्यात काडी टाकू नका, असं पुन्हा पुन्हा त्यांना सांगावं लागत आहे. लढाई ऐन खिंडीत आली असताना, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक यांना उरलेल्या टीमला सोबत घेऊन पक्षाचं अस्तित्व सिध्द करून दाखवायचं आहे. नवीन वर्षात काँग्रेसच्या पदरात काय पडतं माहिती नाही, पण जे आहे ते तरी टिकून राहावं, अशी अपेक्षा निष्ठावंतांची आहे.