

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या संभाव्य उमेदवारी यादीबाबत मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि कोअर कमिटी सदस्यांची चर्चा झाली. बुधवारी पुन्हा भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यात संभाव्य उमेदवारांची यादी तयार होईल. ही यादी गुरुवार, दि. 25 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर होईल. पालकमंत्री व निवडणूक समितीच्या पाच सदस्यांकडून ही यादी मुख्यमंत्र्यांना दिली जाईल. ही यादी आणि घटकपक्षांच्या जागावाटपावर चर्चा होईल. भाजप उमेदवारांची यादी दि. 27 डिसेंबरपर्यंत अंतिम होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी मिरज येथील एका खासगी फार्म हाऊसवर भाजप कोअर कमिटीची बैठक घेतली. तत्पूर्वी त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या पाचसदस्यीय समितीबरोबर चर्चा केली. यावेळी पक्षनिरीक्षक आमदार अतुल भोसले, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग उपस्थित होते. त्यानंतर कोअर कमिटी व प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पक्षनिरीक्षक आ. भोसले, आ. खाडे, आ. गाडगीळ, इनामदार, देशपांडे, ढंग यांच्यासह माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, भाजप नेते दीपक शिंदे, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, नीता केळकर, पृथ्वीराज पवार, दिलीप सूर्यवंशी, धीरज सूर्यवंशी उपस्थित होते.
बैठकीत प्रत्येक प्रभागांचा आढावा घेण्यात आला. तेथील राजकीय व सामाजिक परिस्थिती, मागील निवडणुकांचे निकाल, संघटनात्मक कामगिरी, इच्छुक उमेदवार तसेच विनिंग मेरीट या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. पक्षात अलीकडे मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाल्याने निष्ठावंत कार्यकर्ते आणि नव्याने प्रवेश केलेले कार्यकर्ते यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा वाढली आहे. महापालिकेच्या एकूण 20 प्रभागांमध्ये 78 जागा आहेत. उमेदवारीसाठी भाजपकडे तब्बल 529 इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित करणे नेत्यांसमोर मोठी डोकेदुखी बनले आहे. घटकपक्षांच्या जागा वाटपाचा तिढाही कायम आहे. जनसुराज्य व आरपीआय या घटकपक्षांबरोबर चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याशी चर्चा पुढे सरकेना झाली आहे.
भाजप कोअर कमिटीची बुधवारी बैठक होणार आहे. भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली जाणार आहे. ही यादी दि. 25 रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर सादर होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच आ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे व प्रकाश ढंग हे मुख्यमंत्र्यांसमोर संभाव्य उमेदवारांची यादी ठेवतील, तसेच त्यावर व घटकपक्षांच्या जागावाटपाबाबत चर्चा होईल. दि. 27 रोजी उमेदवारी यादी अंतिम होण्याची शक्यता आहे. मात्र पक्षात बंडखोरी होऊ नये म्हणून उमेदवारी यादी अथवा काही उमेदवारांची नावे ऐनवेळी म्हणजे दि. 30 डिसेंबररोजी जाहीर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.