

सांगली : महापालिका निवडणूक आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील शोएब काझी, कुपवाडमधील सूरज शेख, विटा हद्दीतील राजाराम बोडरे आणि आटपाडी हद्दीतील जितेंद्र काळे टोळी, अशा चार टोळ्यांना हद्दपार करण्यात आले. निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
मिरज शहर हद्दीतील टोळीप्रमुख शोएब ऊर्फ मोहमद युसूफ साहेबपीर चमनमलिक काझी (वय 34, रा. टाकळी रस्ता), सदस्य मतीन ऊर्फ साहेबपीर चमनमलिक काझी (वय 32, रा. टाकळी रस्ता), अक्रम महंमद काझी (वय 42, रा. काझीवाडा, मिरज), आझम महंमद काझी (वय 39, रा. गुरुवार पेठ, मिरज), अल्ताफ कादर रोहिले (वय 36, रा. ख्वॉजा वस्ती, मिरज), मोहसीन कुंडीबा गोदड (वय 26, रा. टाकळी रस्ता, गोदड मळा, मिरज) या टोळीविरुद्ध 2006 ते 2025 या कालावधीत बेकायदा जमाव जमवून गर्दी मारामारी, धार्मिक भावना दुखावणे, नुकसान करणे, गंभीर दुखापत, अग्निशस्त्र व घातक शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न, चोरी, खंडणी, फसवणूक, ॲट्रॉसिटी, विनयभंगाच्या उद्देशाने हल्ला करणे, सार्वजनिक उपद्रव, गृह अतिक्रमण, दरोडा अशी गुन्ह्यांची मालिकाच दाखल आहे. या टोळीविरुद्ध महाराष्ट्र
पोलिस कायदा कलम 55 नुसार मिरज पोलिसांनी प्रस्ताव सादर केला होता.कुपवाड एमआयडीसी हद्दीतील टोळीप्रमुख सूरज ऊर्फ रमजान मौला शेख (वय 44), सदस्य शब्बीर मौला शेख (वय 27), सौरभ विलास जावीर (वय 20), अर्जुन ईश्वरा गेजगे (वय 35, सर्व रा. प्रकाशनगर, गल्ली नं. 6, कुपवाड) या टोळीविरुद्ध 2018 ते 2025 या कालावधीत कट रचून खून करणे, खुनाचा प्रयत्न, जमाव जमवून दुखापत करणे, बंदी आदेशाचा भंग असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. कुपवाड पोलिसांनी त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव बनवला होता.
तसेच विटा हद्दीतील टोळीप्रमुख राजाराम सोपान बोडरे (वय 46), सुदान सोपान बोडरे (वय 44, रा. ढोराळे-जाधववाडी, ता. खानापूर) या दोघांविरुद्ध महिलेचा लैंगिक छळ, दुखापत करून जिवे मारण्याची धमकी, मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदा जमाव जमवून धोक्यात आणणारी कृती करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दोघांविरुद्ध विटा पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव बनवला होता.
आटपाडी हद्दीतील जितेंद्र ऊर्फ जिच्या दगडू काळे (वय 52), रोहित किशोर पवार (वय 19), तोट्या ऊर्फ अक्षय जितेंद्र काळे (रा. करगणी) या टोळीविरुद्ध 2022 ते 2025 या कालावधीत बंद घरात चोरी, रात्री व दिवसा घरफोडी, जबरी चोरी, इच्छापूर्वक दुखापत करणे असे गुन्हे दाखल आहेत. आटपाडी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव बनवला होता. या टोळ्यांविरुद्ध उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, विपुल पाटील यांनी चौकशी करून सविस्तर अहवाल सादर केला. अधीक्षक घुगे यांनी सलग सुनावणी घेऊन चारही टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई केली.
अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे, सहायक निरीक्षक पंकज पवार, मिरज शहरचे निरीक्षक किरण चौगले, कुपवाडचे सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे, विट्याचे निरीक्षक धनंजय फडतरे, आटपाडीचे निरीक्षक विनय बहीर आदींच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी दीपक गट्टे, गजानन बिराजदार, अविनाश पाटील, विलास मोहिते, दादासाहेब ठोंबरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या 2 जिल्ह्यांतून हद्दपारी...
मिरज व कुपवाडमधील टोळ्यांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. विट्यातील टोळीस सांगली जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तर आटपाडी हद्दीतील टोळीस सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे.