

छत्रपती संभाजीनगर : घनसावंगी येथील दोन साखर कारखान्यांचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या घरात शिरून एका मद्यपीने घुडघूस घातला. साहित्याची नासधूस करून शिवीगाळ करत चांगलाच राडा केला. घराबाहेरील फॉर्च्यूनर गाडीवर दगडफेक करून काच फोडली. हा प्रकार बुधवारी (दि.७) मध्यरात्री १:१० वाजेच्या सुमारास केशवनगरी, शहानूरवाडी भागात घडला.
श्यामसुंदर वसंतराव उढाण (४७, रा. सिडको एन-४, गुरुसहानीनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याला जवाहरनगर पोलिसांनी घाटगे यांच्या घरातून ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. घाटीत मेडिकल केले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच उढाण याने पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास ठाण्यातून धूम ठोकली. आरोपी ठाण्यातून पळून गेल्याची वार्ता शहरभर पसरताच उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
फिर्यादी सतीश जगन्नाथ घाटगे (५२, रा. केशवनगरी) यांच्या तक्रारीनुसार, मध्यरात्री त्यांच्या घराचे समोरील दरवाज्याचे लॉक तोडून एक जण आत घुसला. त्याने घरातील सामानाची नासधूस करत होता. त्याच्या हातात चाकूही असून, तो मोठ्याने तुला मारून टाकतो, असे म्हणत शिवीगाळ करत होता. त्याच्या हातात चाकू असल्याने घाटगे पुन्हा बेडरूममध्ये परतले. त्यांनी तातडीने पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर जवाहरनगर ठाण्याचे कर्मचारी व उपनिरीक्षक मारुती खिल्लारे घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर सतीश यांनी हा आपलाच नातेवाईक असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांच्या समोरच दोघांमध्ये प्रचंड शिवीगाळ व वादावादी झाली. त्यानंतर उढाणला घेऊन पोलिस ठाण्यात गेले. तिथे घाटगे हे तक्रार देण्यासाठी आल्याने नाईट अधिकारी उपनिरीक्षक खिल्लारे यांनी आरोपी उढाणला घाटीत मेडिकलसाठी पाठवले. तिथून परतल्यावर घाटगे यांची तक्रार घेणे सुरू होते. त्यावेळी आरोपी उढाण याने ठाण्यातून धूम ठोकली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बुधवारी दिवसभर गुन्हे शाखा व जवाहरनगर पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते.
मात्र उढाण अद्याप पोलिसांना सापडला नाही. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवाहरनगर पोलिस ठण्यातून पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उढाणने धूम ठोकली. इकडे पोलिस शोधाशोध करत असताना तो पुन्हा दर्गा परिसरातील केशवनगरी येथे गेला.तिथे लावलेल्या त्याच्या कारसह त्याने पळ काढला. विशेष म्हणजे त्याच्या कारच्या दोन चाकांची हवा अगोदर सोडण्यात आली होती. तरीही त्याने तशीच कार दामटली.
आरोपी माजी जि.प. अध्यक्षांचा पती
जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील घाटगे व उढाण दोघांचे चांगले प्रस्थ आहे. घाटगे यांनी २०२४ साली अपक्ष म्हणून घनसावंगी विधानसभेतून निवडणूक लढवली होती. तर आरोपी श्यामसुंदर उढाण हे जालना जि.प. च्या माजी अध्यक्षांचे पती आहेत. त्यांचा एक पेट्रोल पंपही आहे. दोघांमध्ये आर्थिक वाद होते असे पोलिस सूत्रांनी सांगितले. तोच आता विकोपाला गेल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. असे सुत्रांनी सांगितले.
रिक्षाने गेला घरी
उढाणने पोलिसांना चकवा देण्यासाठी कार कुठेतरी सोडली. तेथून रिक्षाने एन-४ भागातील आपले घर गाठले. काही वेळातच तो पुन्हा घराबाहेर पडला. त्यानंतर पोलिस त्याला शोधत १५ ते २० मिनिटांच्या अंतराने त्याच्या घरी पोहोचले. तेव्हा सुरक्षारक्षकाने साहेब, १५ मिनिटांपूर्वीच बाहेर गेले, असे सांगितल्याने हताश होऊन जवाहरनगर पोलिस माघारी फिरले, असे सूत्रांनी सांगितले.
ठाण्यात आरोपीला मोकळीच कशी ?
रात्रीच्या वेळी एकाच्या घरात शिरून धिंगाणा घालून तोडफोड केली. धमकावले अशा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. मात्र त्याला ठाण्यात मोकळे सोडल्याने जवाहरनगर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.