सांगली : गुगवाडमध्ये धम्मभूमीचे लोकार्पण; हजारोंनी घेतली बौद्ध धर्माची दीक्षा

सांगली : गुगवाडमध्ये धम्मभूमीचे लोकार्पण; हजारोंनी घेतली बौद्ध धर्माची दीक्षा

जत: पुढारी वृत्तसेवा: सर्वसामान्य माणसाला सन्मानाने जगण्याचा व त्यांचे आयुष्य सुंदर करण्याचे खरे कार्य बौद्ध धम्माच्या माध्यमातून होत आहे. यासाठी अनेक ठिकाणी विपश्यना केंद्र व मोठे विहार उभे होत आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात गुगवाड या ठिकाणी उभारण्यात आलेली ही ऐतिहासिक धम्मभूमी येणाऱ्या काळात अखंड मानव जातीसाठी शांततेचे प्रतिक ठरेल, असे प्रतिपादन पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी केले.

चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीच्या पार्श्वभूमीवर गुगवाड (ता.जत) येथे उद्योजक चंद्रकांत सांगलीकर यांनी उभारणी केलेल्या ऐतिहासिक धम्मभूमीचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी धम्मभूमी आहे. या सोहळ्यात बौद्ध भिक्षुकांच्या हस्ते बौद्ध धर्माची हजारोंनी दीक्षा घेतली. अथर्व चंद्रकांत सांगलीकर सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे ८ कोटी रुपये खर्च करून धम्मभूमी साकारली आहे. या ठिकाणी थायलंडवरून १२ फूट उंचीची पंचधातूच्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. भदंत बोधी पालो महाथेरो आणि भिख्कू संघ यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी हजारो अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

महाराष्ट्र व कर्नाटकसह देशभरातील महाथेरो, भिख्कू संघ, बौद्ध बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजयराव कांबळे, इतिहास संशोधक प्रा. गौतम काटकर, प्रदिप कांबळे, मुख्याध्यापक बी. के. काटकर, उत्तम कांबळे, सागर माळी, श्रीमंत कांबळे, सुरेश कांबळे, किरण पाटील, महेश शिवशरण, सचिन इनामदार, संजीव साबळे, पवन वाघमारे, दयानंद कांबळे, रवी कांबळे, आदीसह समाज बांधवांचे सहकार्य लाभले.

अथर्व चंद्रकांत सांगलीकर सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा उद्योजक सी. आर. सांगलीकर म्हणाले, कालकथीत मुलगा अथर्व याच्या स्मरणार्थ समाजासाठी काम करण्याची इच्छा होती. यासाठी छोट्या स्वरूपात धम्मभूमीच्या उभारणीला वेग आला. त्याला मोठे स्वरूप प्राप्त झाले. आज ते देशभरातील बौद्ध बांधवासाठी कायमस्वरूपी खुले ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी भव्य विपश्यना केंद्र, संशोधन केंद्र, अद्ययावत वाचनालय, युपीएससी व एमपीएससी ट्रेनिंग सेंटर, आदीसह लोकोपयोगी कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

सांगलीकरांनी समाज हिताला प्राधान्य दिले

उद्योजक चंद्रकांत सांगलीकर यांनी समाजासाठी काहीतरी करावे, या उदात्त हेतूने गुगवाड ठीक पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी धम्मभूमी साकारली आहे. भविष्यात या ठिकाणी येणाऱ्या हजारो अनुयायांना ही सुविधा करून देण्याचा मानस सांगलीकर यांचा आहे. लोकार्पण सोहळ्यात सर्वांनीच सांगलीकर यांच्या कार्याचे कौतुक केले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news