Chandrakant Patil : पदवीधर, शिक्षकांचे प्रश्न भाजपच सोडविणार

पालकमंत्री चंद्रकांत पाटील; डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्याचे आवाहन
Chandrakant Patil
Chandrakant Patil
Published on: 
Updated on: 

सांगली : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील भाजपचे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित असून त्यांना पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. पदवीधर आणि शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. यापुढील काळातही या घटकांचे प्रश्न सोडविण्यास शासन कटिबद्ध आहे. शिक्षक आणि पदवीधरांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सक्षम प्रतिनिधींची आवश्यकता आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांना विजयी करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव व पुणे शिक्षक मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या केशवराव चौगुले सभागृहात बैठक घेतली. बैठकीस भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शांतिनाथ कांते, सेक्रेटरी सुहास पाटील, खजिनदार भालचंद्र पाटील यांच्यासह संस्थेचे प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते. या बैठकीत पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न, शासनाचे निर्णय, तसेच उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा झाली. दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी पदवीधर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य सरकारने पदवीधर व शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविले. उच्च शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढावे, यासाठी मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या विना व्याज कर्ज योजनेमुळे अनेक पदवीधर उद्योजक होत आहेत. तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधन वाढीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. महायुती सरकारने त्यांच्या मानधनात भरीव वाढ केली आहे.

युवक, युवती आणि महिलांच्या प्रगतीसाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच उद्योगवाढीवर भर दिला जात आहे. नवीन उद्योगांद्वारे रोजगारनिर्मितीसह स्वयंरोजगारालाही प्रोत्साहन दिले जात आहे.

महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या पाच हजार पदांवरील भरतीला शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे उच्च शिक्षण क्षेत्रातील मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यास मदत होणार आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून, शिक्षक आणि पदवीधरांच्या हिताचे निर्णय घेण्यावर भर दिला जात आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ हे शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्न मांडण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींना संबंधित घटकांच्या समस्या, अपेक्षा आणि अडचणींची जाणीव असणे आवश्यक आहे. भाजपचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे हे प्रश्नांची जाण असलेले उमेदवार आहेत. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांना विजयी करून त्यांना काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news