

शिराळा शहर : शिराळा तालुक्यातील करमाळे येथील ‘तीळगंगा’ नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न रेंगाळला आहे. अभिनेता आमिर खान यांनी या नदीच्या खोलीकरण आणि पुनरुज्जीवनासाठी दिलेले आश्वासन तीन वर्षांनंतरही प्रत्यक्षात उतरले नसल्याने परिसरात तीव्र नाराजी आहे.
महादेवाच्या डोंगररांगातून उगम पावणारी तीळगंगा नदी सुमारे 27 किलोमीटरचे अंतर पार करते. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी ही नदी उन्हाळ्यात मात्र पूर्ण कोरडी पडते. त्यामुळे करमाळे आणि परिसरातील गावांना दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
ऑगस्ट 2023 मध्ये अभिनेता आमिर खान यांनी करमाळे गावाला भेट देण्याचे आश्वासन दिले होते. ‘पाणी फाउंडेशन’ आणि स्थानिक संस्थांच्या माध्यमातून नदीचे खोलीकरण व जलसंधारणाची कामे मार्गी लावण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर आमिर खान यांची कन्या इरा खान आणि सामाजिक कार्यकर्ते सत्यजित भटकळ यांनी ‘आगस्तू फाउंडेशन’च्या माध्यमातून या विषयावर काही बैठकाही घेतल्या. मात्र, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला गती मिळू शकली नाही.