

सांगली : व्यावसायिक अभ्यासक्रमांची व्याप्ती खूप वाढली आहे. माहिती तंत्रज्ञानाचा परिणाम अभ्यासक्रमांवरही झाला आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रातील करिअर निवडताना अचूक निर्णय महत्त्वाचा असतो. अत्याधुनिक शाखेत प्रवेश घ्या, असे आवाहन यशोदा टेक्निकल कॅम्पस साताराचे रणधीरसिंह मोहिते यांनी केले.
दैनिक पुढारीच्यावतीने आयोजित करण्यात आलेले 'एज्युदिशा २०२६' हे खास शैक्षणिक प्रदर्शन कच्छी जैन भवन येथे सुरू झाले आहे. काल, शनिवारी दुसऱ्या दिवशीही सकाळपासून सायंकाळपर्यंत या प्रदर्शनाला पालक आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. व्यावसायिक अभ्यासक्रमातील संधी या विषयावर मोहिते यांनी अगदी सविस्तर माहिती दिली.
ते म्हणाले, व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. पण शिक्षणाच्या इतक्या प्रचंड वाटा उपलब्ध झाल्या आहेत, की पालकांसोबत विद्यार्थ्यांचाही गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. या परिस्थितीत पालकांनी अत्याधुनिक शाखेचा शोध घेऊन तिथेच पाल्याला प्रवेश घ्यावा. त्यासाठी पालक, विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांचा संवाद महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करण्याची जबाबदारी शिक्षण संस्थेची असते. अशीच संस्था निवडा. हा निर्णय बिनचूक असणे महत्त्वाचे असते, असे त्यांनी सांगितले. स्वागत शाखा व्यवस्थापक युवराज पानारी यांनी केले. यावेळी अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.