सांगली : नागेवाडीच्या ‘यशवंत’ कारखान्याची धुराडी यंदा पेटणार!

सांगली : नागेवाडीच्या ‘यशवंत’ कारखान्याची धुराडी यंदा पेटणार!

विटा : विजय लाळे : खानापूर-आटपाडी तालुक्यात यावर्षी पुन्हा शिल्लक उसाचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. तर नागेवाडीच्या 'यशवंत' ची धुराडी यंदा पेटणार असल्याच्या हालचाली पडद्यामागे सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी निःश्वास टाकला आहे. खासदार संजय पाटील, काँग्रेस नेते व माजी मंत्री आमदार विश्वजित कदम आणि सांगली जिल्हा बँकेचे संचालक महेंद्रअप्पा लाड यांच्यामध्ये चर्चेच्या फेऱ्या झाल्या. या चर्चा सफल झाल्याने पुढील महिन्यात कारखाना सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

खानापूर तालुक्यात टेंभू, ताकारी, आरफळ या योजनांचे पाणी शेतीसाठी उपलब्ध झाल्यामुळे गेल्या तीन – चार वर्षात खानापूर तालुक्यात ऊस लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सन २०२१-२२ मध्ये उसाचे गाळप क्षेत्र १२ हजार हेक्टर इतके झाले होते. ते एकदम वाढून चालूवर्षी २० ते २१ हजार हेक्टर्सच्या वर गेलेले आहे. तालुका आणि परिसरात खानापूर तालुक्यातील उदगिरी शुगर्स-बामणी आणि विराज केन्स-आळसंद या व्यतिरिक्त साखर कारखानेच नाहीत. त्यामुळे शिल्लक उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षांपासून नागेवाडी साखर कारखाना बंद आहे. हा साखर कारखाना कर्जबाजारी झाल्यानंतर त्या कर्जाची परतफेड झाली नाही. त्यामुळे तो जिल्हा बँकेने ताब्यात घेतला. त्यानंतर आमदार बाबर यांनी कर्जाचे पुनर्वसन व हप्ते पाडून घेण्यासाठी प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही.

खानापूर तालुक्यातील संपूर्ण ऊस गाळप करण्याची क्षमता कारखान्यांकडे नाही

परिणामी, बँकेने कारखाना लिलावात काढला. अखेर हा साखर कारखाना खासदार संजय पाटील यांच्या गणपती जिल्हा संघाने ५६ कोटी ५१ हजार रुपयांना खरेदी केला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी २०२० चा गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी खासदार संजय पाटील यांनी हा कारखाना सुरु केला. त्यावेळी त्यांनी २ हजार ७५० रुपये दर देतो, असे सांगितले होते. परंतु त्या गळीत हंगामाचे पैसे चालू वर्षी सप्टेंबरअखेर पर्यंत द्यायचे चालू होते. मागल्या वर्षी हा कारखाना बंदच होता. त्यामुळे खानापूर तालुक्यातील उदगिरी शुगर्स-बामणी आणि विराज केन्स-आळसंद या दोनच कारखान्यांचा गळीत हंगाम झाला. यावर्षीही हेच दोन कारखाने सुरु होत आहेत. परंतु या दोन कारखान्यांची यंत्रणा खानापूर तालुक्यातील संपूर्ण ऊस गाळप करण्यासाठी अपुरी पडत आहे.

यंदा उसाचे उत्पन्न अधिक

गेल्या वर्षी १५ ते २० टक्के ऊस वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. परंतु विचित्र नैसर्गिक परिस्थिती आणि आलेले वेगवेगळ्या योजनांचे पाणी यामुळे जमिनीचा सुधारलेला पोत (दर्जा) पाहता, उत्पन्न देणारे हमखास पीक म्हणून ऊसाला पर्याय नसल्याने शेतकऱ्यांनी यावर्षीही ऊस घेणेच पसंत केले आहे. यंदा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झालेला आहे. तरीही पूर्ण क्षमतेने सर्व कारखाने सुरु नाहीत. चालू वर्षी अतिवृष्टीमुळे पंचगंगा आणि कृष्णाकाठ च्या जमिनीमध्ये अद्यापही खूप पाणी आहे. परिणामी गुरुदत्त कारखाना, शिरोळ, आदी कारखान्यांच्या ऊस तोड टोळ्या खानापूर तालुक्यात आलेल्या आहेत. परंतु एकदा का नदीकाठच्या जमिनी कोरड्या झाल्या की, सगळ्या टोळ्या परततील आणि खानापूर – आटपाडी तालुक्यातील ऐन भरात आलेला ऊस कुठे न्यायचा असा प्रश्न भेडसावणार आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर नागेवाडीचा यशवंत साखर कारखाना सुरु होत आहे. खासदार संजय पाटील आणि काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, सांगली जिल्हा बँकेचे संचालक महेंद्रअप्पा लाड यांच्यातील चर्चेच्या फेऱ्यांनंतर पुढच्या महिन्यात यशवंत साखर कारखाना सुरु करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामळे कारखाना सुरु झाल्यास तालुक्यातील शिल्लक उसाचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदतच होणार आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news