सांगली : ‘टार्गेट’ 140 कोटी लिटर्स इथेनॉल निर्मितीचे! .. उसाला जादा दर सहजशक्य

सांगली : ‘टार्गेट’ 140 कोटी लिटर्स इथेनॉल निर्मितीचे! .. उसाला जादा दर सहजशक्य

सांगली; विवेक दाभोळे :  'इट्वेंन्टी' या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमातंर्गत केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये आगामी वर्षात इथेनॉलचे 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. साखरेचे उत्पादन कमी करून थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्राधान्याने सवलती, योजना जाहर करत आहे. राज्यात साखर कारखान्यांसाठी येत्या वर्षांसाठी (सन 2022-2023) जवळपास 140 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट आहे. यातून शिल्लक साखर साठ्याचा प्रश्न काहिसा सुटेल, तसेच उसाला जादा दरदेखील शक्य होणार आहे.

सन 2020-2021 पासून साखरेच्या शिल्लक साठ्याचे ओझे कायम आहे. आता नवीन गळीत हंगाम सुरू झाला आहे. यातून साखरेचा साठ वाढणार आहे. याच दरम्यान, साखरेच्या उत्पादनावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवून थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला चालना दिली जात आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने इथेनॉल खरेदी दरात घसघशीत वाढ केली आहे. राज्यातील सहकारी आणि खासगी मिळून 51 कारखान्यांमध्ये इथेनॉलची निर्मिती होते. या वर्षासाठी 140 कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

साखरेचा शिल्लक साठा प्रमाणाबाहेर शिल्लक राहू नये, यासाठी सरकार इथेनॉल उत्पादनास प्राधान्य तर देत आहेच. याशिवाय साखरेच्या उत्पादनावरदेखील मर्यादा राहणार आहे. साखर साठा वाढून कारखान्यांची कोंडी होऊ नये, यासाठी सरकारने इथेनॉल उत्पादन आणि पेट्रोलमध्ये मिसळून विक्री करण्यासाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. तसेच कारखानदार इथेनॉल उत्पादनाकडे आकर्षित व्हावेत, यासाठी प्रतिलिटर इथेनॉलचा दर आता 65.60 रुपये प्रतिलिटर घोषित केला आहे. मात्र, यातूनच इथेनॉलला चांगला दर नाही म्हणणार्‍या कारखानदारांवर किमान साखर साठा तरी कमी व्हावा, म्हणून तरी इथेनॉल उत्पादनाकडे वळण्याची वेळ आली आहे.

तीन वर्षांपासून केंद्र सरकार इथेनॉल निर्मिती जादा व्हावी, याकरिता कारखान्यांसाठी आर्थिक मदतीच्या योजना, सवलती जाहीर करत आहे. मात्र, निकषांमुळे अनेक कारखान्यांना याचा लाभ घेता आलेला नाही.

इथेनॉल निर्मिती क्षमता 200 कोटी लिटर

'इट्वेंन्टी' या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देशात इथेनॉलचे उत्पादन वार्षिक 450 कोटी लिटर करणे गरजेचे आहे. मात्र, यासाठी उसाचे एकरी उत्पादन वाढविण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील सरासरी ऊस उत्पादन 137 लाख टनांवर आहे. उताराही सरासरी 10.40 आहे. तसेच गाळप दिवसांची सरासरी 173 दिवस आहे. दोनशेहून जास्त कारखाने राज्यात आहेत. उसाचे एकरी उत्पादन वाढवले तर कारखाने जास्त दिवस गाळप करू शकतील, इथेनॉल निर्मिती क्षमतेतही वाढ होईल. आजच्या घडीला राज्याची इथेनॉल निर्मिती क्षमता 200 कोटी लिटर असली तरी प्रत्यक्षात 134 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले होते. ऊस उत्पादन वाढले तर इथेनॉल निर्मितीची क्षमता पुरेपूर वापरता येईल, शिवाय अनेक कारखानेही इथेनॉल निर्मितीसाठी तयारीस लागले आहेत. त्यांनाही उसाचा तुटवडा जाणवणार नाही. मात्र, याची शासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

लिटरमागे 65.60 रुपयांचा ठोक दर

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमांर्तगत केंद्र सरकारने इथेनॉलच्या नवीन वर्षांसाठी खरेदी दरात मोठीच वाढ केली आहे. थेट उसाच्या रसापासून बनणार्‍या इथेनॉलसाठी प्रतिलिटर आधी असलेल्या 63.45 रुपये दरात वाढ करून 65.60 रु. असा दर निश्चित केला. वर्ष 2022 डिसेंबर ते 2023 नोव्हेंबर वर्षासाठी ही वाढ असणार आहे. दरम्यान, साखर कारखान्यांना इथेनॉल विक्रीनंतर जेमतेम दिवसांतच पैसे मिळणार आहेत. परिणामी हा सौदा कारखान्यांसाठी मोठाच फायदेशीर ठरत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news