

सांगली : महापालिका निवडणुकीच्या 78 जागांसाठी मंगळवार, दि. 30 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसअखेर एकूण 964 हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. भाजपमध्ये बंडखोरीचे पेव फुटले आहे. त्यामुळे अपक्षांची गर्दी वाढली आहे. भाजपने सर्व 78 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसने 34, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने 22, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने 33, शिवसेना 50 ते 60, शिवसेना (उबाठा) व मनसेने 35 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हे प्रमुख पक्ष निवडणूक मैदानात स्वतंत्रपणे उतरले आहेत. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात अघोषित समझोता दिसत आहे. त्यामुळे सध्या तरी चौरंगी लढतींचे चित्र दिसत आहे. अर्ज माघारीनंतर म्हणजे दि. 2 जानेवारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट होईल.
महापालिका निवडणुकीसाठी सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरांमध्ये एकूण सहा निवडणूक अधिकारी कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुविधा केली होती. प्रत्येक कार्यालयांतर्गत तीन ते चार प्रभागांचा समावेश होता. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळपासूनच कार्यालयांमध्ये गर्दी सुरू झाली. दुपारी अकरानंतर भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उबाठा)चे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी आले. त्याचबरोबर नाराज इच्छुकांनीही अपक्ष अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. निवडणूक कार्यालयांच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उमेदवार, सूचक व अनुमोदक वगळता इतर कोणालाही कार्यालयात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे समर्थकांना कार्यालयाबाहेरच ताटकळत थांबावे लागले. काही ठिकाणी प्रवेशावरून पोलिस व कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमकीही झाल्या. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत बंदोबस्त अधिक कडक केला.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये प्रभागनिहाय अर्ज भरण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने, बाहेर गर्दी असली तरी, आत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीत सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवून होते. निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त (निवडणूक) अश्विनी पाटील यांनी निवडणूक कार्यालयांना भेट देत आढावा घेतला. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव दिवसभर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. दुपारी तीन वाजता सहाही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यानंतर आत उपस्थित इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
कोणत्याही पक्षाने सोमवारपर्यंत अधिकृत उमेदवारी यादी जाहीर न केल्याने अनेक ठिकाणी संभ्रमाचे वातावरण होते. पक्षांनी निश्चित केलेल्या उमेदवारांनाच अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आधी अर्ज दाखल करून नंतर एबी फॉर्मची प्रतीक्षा केली. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे सर्वाधिक इच्छुकांची संख्या आहे. मात्र ज्यांना पक्षाकडून अर्ज दाखल करण्याचा निरोप मिळाला नव्हता, अशांपैकी अनेकजण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात उपस्थित होते.
भाजपने उमेदवार निश्चित केले असले तरी, सकाळपर्यंत एबी फॉर्म वितरित झाले नव्हते. मंगळवारी सकाळनंतर उमेदवारांना एबी फॉर्म वाटप सुरू केले. सांगली व कुपवाडमधील उमेदवारांना आमदार सुधीर गाडगीळ व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी, तर मिरजेतील उमेदवारांना आमदार सुरेश खाडे यांनी एबी फॉर्म दिले. एकेका उमेदवाराला बोलावून फॉर्म देण्यात आले. त्यानंतर संबंधित उमेदवारांनी आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जाऊन एबी फॉर्म सादर केले.
काँग्रेस व राष्ट्रवादीकडील उमेदवारी निश्चितीसही विलंब झाल्याने अनेक उमेदवारांची धाकधूक वाढली होती. काही निवडणूक कार्यालयांमध्ये दुपारपर्यंत एबी फॉर्म न मिळाल्याने उमेदवार प्रतीक्षेत होते. साधारण दीडच्या सुमारास एबी फॉर्म कार्यालयात पोहोचल्यानंतर उमेदवारांचा जीव भांड्यात पडला. अर्ज भरण्याची प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली असली तरी, बंडखोर व अपक्ष उमेदवारांमुळे राजकीय घडामोडी अधिक वेग घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. समाजवादी पक्षाने 4 उमेदवार उभे केले आहेत. जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांनी प्रभाग क्र. 8 मधील सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी दाखल केली आहे.
आज छाननी; 2 जानेवारीपर्यंत माघार
उमेदवारी अर्जांची छाननी दि. 31 डिसेंबररोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल. छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेचच वैध उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दि. 2 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. निवडणूक चिन्ह वाटप दि. 3 जानेवारी रोजी होणार आहे. अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी 3 जानेवारीरोजी प्रसिद्ध होईल. मतदान दि. 15 जानेवारीरोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आहे. मतमोजणी दि. 16 जानेवारीरोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यानंतर निकाल घोषित केला जाईल.
उमेदवार चर्चेत रंगले; माघारीनंतर संघर्ष रंगणार
राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. एकमेकांविरोधात लढणारे उमेदवार निवडणूक कार्यालयात हसतमुखाने चर्चा करत होते. काहींनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. मात्र उमेदवारी अर्ज माघारीनंतरच खऱ्याअर्थाने निवडणुकीचा संघर्ष सुरू होईल.
एबी फॉर्मचा घोळ;विलंबामुळे दमछाक
भाजपचे एबी फॉर्म उमेदवारांना मंगळवारी सकाळी मिळाले. मात्र अर्ज भरण्यास तास-दोन तासाचा कालावधी उरला तरी, राष्ट्रवादी, शिवसेना, तसेच राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या काही उमेदवारांना एबी फॉर्म मिळाला नव्हता. त्यामुळे संबंधित उमेदवार चिंतेत होते. त्यांना अखेरच्याक्षणी एबी फॉर्म मिळाले. एबी फॉर्म विलंबाने मिळाल्याने संबंधित उमेदवारांची बरीच दमछाक झाली.
सर्व पक्षांकडून 48 माजी नगरसेवक मैदानात
महापालिका निवडणुकीत सर्व पक्षांकडून 48 माजी नगरसेवक (2018 ते 23 या कालावधीतील) मैदानात उतरले होते. भाजपकडून 21, राष्ट्रवादी (अजित पवार) 10, काँग्रेसकडून 8, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून 6, शिवसेना (एकनाथ शिंदे) 2 आणि जनसुराज्य शक्ती पक्षाकडून एका माजी नगरसेवकाला उमेदवारी मिळाली आहे.