Sangli Municipal Corporation: पॅचवर्क, ड्रेनेज दुरुस्तीसह आठ कोटींच्या कामांना मंजुरी

सभापती अतुल माने; गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांचे पॅचवर्क पूर्ण करा
Sangli Municipal Corporation
Sangli Municipal CorporationPudhari Photo
Published on
Updated on

सांगली : महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा, ड्रेनेज तसेच चिल्ड्रन पार्कच्या कामांसह सुमारे ८ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि पॅचवर्कची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी दिले.

महापालिकेत शुक्रवारी स्थायी समितीची सभा झाली. सभापती अतुल माने अध्यक्षस्थानी होते. सदस्य मैनुद्दीन बागवान, अभिजित भोसले, सुरेश बंडगर, उदय बेलवलकर, स्वाती शिंदे व अन्य नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेतला. महापालिका बांधकाम विभागामार्फत प्रभाग समिती क्रमांक १ ते ४ च्या कार्यक्षेत्रातील विविध रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. प्रभाग समिती क्रमांक १ अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी ९५.८५ लाख रुपये, प्रभाग समिती क्रमांक २ साठी १.२१ कोटी रुपये, प्रभाग समिती क्रमांक ३ साठी १.६० कोटी, प्रभाग समिती क्रमांक ४ अंतर्गत वॉर्ड क्रमांक ३, ४, ५, ६, ७ व २० मधील रस्त्यांसाठी १.४४ कोटी रुपये इतक्या अंदाजपत्रकीय खर्चास मंजुरी देण्यात आली.

या कामांसाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महा ई-टेंडरद्वारे जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यास आणि निविदा प्रक्रियेसाठी येणार्‍या खर्चास मान्यता देण्यात आली. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरवस्था दूर करून वाहतूक सुरक्षित करण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असे निर्देश सभापती माने यांनी दिले. कुपवाड-कापसे प्लॉट येथून सैनिकनगर टाकी, गव्हर्न्मेंट कॉलनी टाकी आणि वानलेसवाडी टाकी भरण्यासाठी टाकण्यात आलेल्या गुरुत्व नलिकेला विजयनगर येथील रेल्वे पुलाखाली गळती लागली. ही गळती दुरुस्तीच्या २९.६० लाखांच्या कामास मंजुरी देण्यात आली.

कुपवाड प्रभागातील वॉर्ड क्रमांक ८, अकुजनगर येथील सर्व्हे क्रमांक २००/२ब/१ या महापालिकेच्या खुल्या जागेत चिल्ड्रन पार्क विकसित करण्याच्या सुमारे १ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली. प्रत्येक प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील ड्रेनेज दुरुस्तीसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये याप्रमाणे दोन कोटीच्या निविदांना मान्यता देण्यात आली. यातून ड्रेनेज लाईन दुरुस्ती, चेंबर दुरुस्तीची कामे पूर्ण केली जाणार आहेत. पॅचवर्कचे काम गणेशोत्सवापूर्वी करण्याचे आदेश दिेले आहेत. उत्सव काळात नागरिकांची कोणतीही तक्रार येता कामा नये. सर्व खड्डे बुजविण्याचे आदेश दिल्याचे माने यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news