सांगली : गांजा तस्करीतील बडे मासे मात्र मोकाटच

सहा महिन्यांत 18 जणांना अटक, गांजाची विक्री जोमात : कारवाई होणार तरी कधी?
Sangli news
सांगली जिल्ह्यात कर्नाटक, ओडिशा, आंध्र प्रदेशमार्गे गांजाची तस्करी केली जाते.
शीतल पाटील

सांगली : गेल्या सहा महिन्यांत शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात गांजा तस्करांवर पोलिसांनी कारवाई केली. 18 गांजा तस्करांना तुरुंगाची हवा खावी लागली. पण आतापर्यंतच्या कारवाईत बडे मासे मात्र पोलिसांच्या गळाला लागलेले नाहीत. परिणामी गांजाची विक्री जोमाने सुरू असून बड्या तस्करांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न आहे.

रेल्वेतून गांजा तस्करी नित्याचीच ! पाळेमुळे शोधून काढणे अतिशय गरजेचे

सांगली जिल्ह्यात कर्नाटक, ओडिशा, आंध्र प्रदेशमार्गे गांजाची तस्करी केली जाते. विशेषतः ओडिशातून सर्वाधिक गांजा सांगलीत येतो. मध्यंतरी गांजा तस्करीतील बड्या माशाच्या शोधात पोलिसांनी ओडिशापर्यंत धडक मारली होती. पण हाती काहीच लागले नाही. ओडिशापासून सांगलीपर्यंत कुठेच चारचाकी गाडीची तपासणी होत नाही. त्याचा फायदा गांजा तस्कर घेत आहेत. काहीजण रेल्वेतून गांजाची तस्करीही करीत आहेत. अजूनही गांजाची तस्करी कमी झालेली नाही. महिन्यात दोन-चार गांजा तस्करांवर कारवाई केली जात आहे.

गेल्याच महिन्यात ओडिशामधून गांजा तस्करी करणार्‍या आंतरराज्य टोळीला तासगाव पोलिसांनी पकडले होते. त्यांच्याकडून 34 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या टोळीकडे गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसेही सापडली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुणाला सांगलीवाडी टोलनाक्यावर गांजासह पकडले होते. या कारवाया सातत्याने पोलिसांकडून सुरू आहेत. पण यात बडे मासे कधीच गळाला लागलेले नाहीत.

Sangli news
अंमली पदार्थाची तस्करी करणारे त्रिकूट जेरबंद; गांजा कोयते, रोकड, जप्त

जिल्ह्यात गांजा तस्करी जोमात आहे. गांजाच्या आहारी गेल्याने तरुणांची पिढी बरबाद होत चालली आहे. अनेकांची पावले गुन्हेगारीकडे वळू लागली आहेत. गांजाच्या नशेत घरफोडी, चेन स्नॅचिंग, जबरी चोरीसह मारामारीचे गुन्हे केले जात आहेत. हा गांजा नेमका कोठून येतो, तो कुठे जाणार आहे, त्याचा खरेदीदार कोण आहे, गांजा कोठून आणला आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून फारसा होत नाही. त्यामुळे जुजबी कारवाई होत असल्याने गांजा तस्करांचे धाडस वाढत चालले आहे. केवळ गांजा विक्रीस आणलेला गुन्हेगारच पोलिसांच्या तावडीत सापडतो. गांजा तस्करांची साखळी तोडण्यासाठी पोलिसांनी त्याच्या मुळावर घाव घालण्याची गरज आहे.

जिल्ह्यात गांजाची शेती

परराज्यातून सांगलीत गांजा येतोच, शिवाय जिल्ह्यातील जत, मिरज, शिराळा तालुक्यात काही गावांत गांजाची शेतीही केली जाते. जत तालुक्यातील एका गावात पोलिसांनी छापा टाकून गांजाची शेती उद्ध्वस्त केली होती. यावेळी 19 किलो गांजा मिळाला होता. मिरजपूर्व भागातील एका गावात उसाच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती. गांजाच्या झाडांचा वास आला तरच पोलिसांकडून कारवाई केली जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news