

आटपाडी : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे (ता. आटपाडी) येथील शाखेवर बुधवारी रात्री पडलेल्या दरोड्यात सुमारे 10 किलो सोने व 25 किलो चांदी अशा कोट्यवधी रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरोडेखोरांनी स्ट्राँग रूममधील तब्बल 22 लॉकर फोडले आहेत. बँकेची खिडकी कापून दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केल्याचे घटनास्थळी दिसून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 किलो सोने, 25 किलो चांदी हा प्राथमिक अंदाज आहे. बँकेतून किती रोख रक्कम लंपास केली आहे, तेही येत्या दोन दिवसांत समजेल. त्यामुळे एकूण ऐवजाची व्याप्ती वाढण्याची मोठी शक्यता आहे. लॉकरधारकांकडून ऐवजाची यादी मिळाल्यानंतर सोन्या-चांदीचा अंतिम आकडा आणि किंमतही समजेल. घटनेनंतर बघ्यांसह ठेवीदारांनी बँकेच्या दारात गर्दी केली होती. जिल्हा बँकेच्या इतिहासातील विशेषतः ग्रामीण भागातील हा सर्वात मोठा दरोडा असल्याचे घटनास्थळी बोलले जात होते.
झरे बस स्थानक परिसरात तुकाराम नाना पडळकर यांच्या मालकीच्या इमारतीत जिल्हा बँकेची ही शाखा भाड्याने सुरू आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी बँकेच्या पूर्वेकडील बाजूची लोखंडी खिडकी कटरने कापून आत प्रवेश केला. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे निष्क्रिय केले व सर्व हालचालींची नोंद असलेला ‘डीव्हीआर’ काढून घेतला. त्यानंतर ऐवज लंपास केला. हाताचे ठसे राहू नयेत यासाठी दरोडेखोरांनी हातमोजांचा वापर केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बँक कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर आल्यानंतर दरोडा पडल्याचे समजले. बँक शाखेबाहेर लॉकरधारकांची मोठी गर्दी झाली. आयुष्यभराची पुंजी चोरीला गेल्याने या ग्राहकांमध्ये तीव्र संताप व चिंता पसरली. आटपाडी पोलिस, ठसेतज्ज्ञ, गुन्हे अन्वेषण शाखा व श्वानपथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाचा वेध घेण्यात येत आहे.
फिर्याद अशी की...
शाखाधिकारी व कॅशिअर हणमंत धोंडिबा गळवे (वय 46) यांनी फिर्याद दिलेली आहे. फिर्यादीत झरे (ता. आटपाडी) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत चोरी झाली असून, चोरट्यांनी 22 लॉकर फोडून सुमारे 9.30 लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केल्याचा उल्लेख आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी डल्ला मारलेल्या ऐवजाची व्याप्ती मोठी आहे.
बँकेत गॅस कटर, सिलिंडर
बँकेच्या पाठीमागील खिडकीची काच फुटलेली व गज कापलेले असल्याचे दिसले. आतमध्ये साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असून, गॅस कटर, सिलिंडर व पाईप पडलेले होते. दरोडेखोरांनी नामांकित कंपनीचे लॉकर गॅस कटरने तोडून दागिने चोरले. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही, सायरन व नेटच्या वायर कापून ‘डीव्हीआर’ घेऊन पुरावे नष्ट केल्याचे निष्पन्न झाले.
दानधर्म पळवला
कुरुंदवाडी येथील बिरोबा देवस्थानचे झरे शाखेत लॉकर आहे. देवाला भक्त मोठ्या प्रमाणात दानधर्म करतात. भक्तांनी वाहिलेले सोने आणि चांदी त्यांनी येथे लॉकरमध्ये ठेवली होती. तीदेखील लॉकरमधून लंपास केली आहे.