Shaktipeeth Highway Project : कडेगाव तालुक्यातही ‘शक्तिपीठ’ची मोजणी रोखली

शेतकरी आक्रमक; नेवरीत पोलिसांचा मोठा फौजफाटा; ॲड. दीपक लाड यांना घेतले ताब्यात
Shaktipeeth Highway Project : कडेगाव तालुक्यातही ‘शक्तिपीठ’ची मोजणी रोखली
Published on: 
Updated on: 

कडेगाव शहर : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक तीव्र झाला असून, बुधवार, दि. २५ रोजी नेवरी (ता. कडेगाव) येथे महामार्गाच्या मोजणीदरम्यान प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. मोजणीला विरोध करत शेकडो शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करीत मोजणी रोखण्याचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. याचवेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अ‍ॅड. दीपक लाड यांना पोलिसांनी शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले. नेवरी येथे महामार्गाच्या मोजणीसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू असताना शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. अ‍ॅड. दीपक लाड यांना ताब्यात घेताना शेतकरी आडवे आले.

खानापूर तालुक्यात तणाव कायम

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यात तणाव कायम आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही विटा ते मायणी रस्त्यावर पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावला होता. रविवारी रात्रीपासून खानापूर तालुक्यामध्ये दाखल झालेला पोलिसांचा फौजफाटा बुधवारी चौथ्या दिवशीही कायम होता. एकीकडे शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी आणि आंदोलक रक्त सांडायला तयार आहेत, तर दुसरीकडे कोणत्याही स्थितीत मोजणी करणारच, असा निर्धार महसूल प्रशासनाने केला आहे. सोमवारपासून मोजणीच्या दृष्टीने महसूल विभागाचे सुरू असलेले प्रयत्न तिसऱ्या दिवशीही कायम होते.

विटा पोलिस ठाण्यात ठिय्या; सुटकेनंतर तणाव निवळला

शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे दीपक लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाने आक्रमक वळण घेतले. याची माहिती मिळताच आंदोलक श्रीदास होनमाने यांनी परिसरातील नागरिकांसह थेट विटा पोलिस ठाणे गाठले. दीपक लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोणत्या कारणावरून ताब्यात घेतले, असा जाब विचारत होनमाने यांनी कारवाईचा निषेध केला. यावेळी नागरिकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. सुटका होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर दबाव निर्माण होऊन अखेर पोलिसांनी लाड यांची सुटका केली.

क्रांतिवीरांच्या त्यागाची आणि पत्री सरकारच्या संघर्षाची ही भूमी आहे. याच मातीत स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांविरोधात लढा दिला. आम्ही त्या क्रांतिकारकांचे वारसदार असून, अन्यायाविरोधात लढणे आमच्या रक्तात आहे. माझ्यावर कारवाईनंतर विटा पोलिस ठाण्यावर खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी घातलेला घेराव हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा प्रत्यय देणारा होता. पोलिसांच्या या वागणुकीविरोधात आम्ही कायदेशीर भूमिका घेणार असून, संबंधित प्रकाराची चौकशी व्हावी यासाठी पाठपुरावा करणार आहोत.
- अ‍ॅड. दीपक लाड, निमंत्रक, शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.