

जत : जत शहरातील क्रीडा संकुल परिसरात प्रेमसंबंधाच्या संशयावरून पतीने पत्नी व तिच्या प्रियकरावर कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यात पत्नी अंकिता शेजूलाल कनोजिया (रा. शिरढोण, ता. कोरेगाव, जि. सातारा, सध्या रा. जत) व प्रियकर सत्यजित ईश्वर संकपाळ (वय 25, रा. कणसेवाडा, जत) हे जखमी झाले आहेत. ही घटना शनिवार, दि. 19 रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली आहे.
जखमी संकपाळ याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत जत पोलिस ठाण्यात जखमी अंकिता कनोजिया हिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित अजय संजय जाधव (रा. शिरढोण, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्याविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
घटनास्थळ व जत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सत्यजित संकपाळ याचे वर्षभरापूर्वी अंकिता हिच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमप्रकरण सुरू झाले. तिला भेटण्यासाठी पुणे येथे जात होता. या प्रेमातून त्याने अडीच महिन्यांपूर्वी तिला जत येथील दुधाळ वस्ती येथे भाड्याच्या खोलीत आणले. यामुळे सत्यजित संकपाळ व अंकिताचा पती संजय जाधव या दोघांमध्ये वारंवार वाद सुरू होता.
शनिवारी दुपारी अचानक संजय जाधव हा सत्यजित याच्या घरी दाखल झाला. तेथे त्याचा अंकितासोबत वाद झाला. त्यानंतर हे प्रकरण बाहेर जाऊन मिटवू, असे सांगत तिघेही जत शहरातील क्रीडा संकुल परिसरात आले. येथे त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. रागाच्या भरात संजय याने कोयत्याने सत्यजित याच्यावर मानेवर, दंडावर व पायावर वार केले. त्याला रोखण्यास धावलेल्या अंकिताच्या हातावरही वार केला.
यानंतर तेथून तो पसार झाला. गंभीर जखमी सत्यजित याला जत ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून सांगलीला हलविण्यात आले. याबाबत जत पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.