Islampur Renaming | इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतरण करण्याचा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर; शहरात पेढे वाटून आनंदोत्सव
Islampur Renaming Latest News
इस्लामपूर: मागील अनेक वर्ष मागणी होत असलेल्या इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नामांतरण करण्याच्या प्रस्तावास शुक्रवारी (दि.१८) विधिमंडळात मंजुरी देण्यात आली. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. नामांतरणाचा प्रस्ताव मंजूर होताच शहरात शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटनांनी फटाक्यांची आतषबाजी करत व पेढे वाटत एकच जल्लोष केला.
सन 1986 साली शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची इस्लामपुरात जाहीर सभा झाली होती. या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण व्हावे, अशी घोषणा केली होती. तेव्हापासून शहराच्या नामांतरणाचा प्रश्न चर्चेत होता. शिवसेना, शिवप्रतिष्ठान यासह हिंदुत्ववादी संघटनांनी नामांतरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. इस्लामपूर नगरपालिकेत विकास आघाडीची सत्ता असताना नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 18 डिसेंबर 2021 च्या शेवटच्या मासिक सभेत ईश्वरपूर नामांतरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इस्लामपूर येथे झालेल्या जाहीर सभेत लवकरच इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण करू, अशी घोषणा केली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी शहरातून सुमारे 25 ते 30 हजार नागरिकांच्या साह्यांचे निवेदन शासनाला दिले होते. आ. सदाभाऊ खोत यांनी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन ईश्वरपूर नामकरण करण्याची तसेच विधान परिषदेतही मागणी केली होती.
सन 2014 साली नामकरण समितीही स्थापन करण्यात आली होती. शिवप्रतिष्ठानचे बाळासाहेब गायकवाड, गजानन पाटील यांनीही सातत्याने यासाठी पाठपुरावा चालू ठेवला होता. शुक्रवारी विधानसभेत व विधान परिषदेत मंत्री चंद्रकांत पाटील व छगन भुजबळ यांनी लोक भावनेचा आदर करत इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतरण करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात येत असल्याची घोषणा केली. तसेच हा विषय केंद्राच्या अखऱ्यातीत येत असल्याने हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी लवकरच केंद्राकडे पाठवण्यात येत असल्याचे सांगितले.

