

इस्लामपूर : इस्लामपूर एमआयडीसीमध्ये 100 युनिट्स आहेत. या युनिट्समधून हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र एमआयडीसीमध्ये विविध सुविधांचा अभाव आहे. सोयी - सुविधा नसल्याने एमआयडीसी परिसरात सारी दुरवस्था झाली आहे. ही दुरवस्था कधी थांबणार, असा सवाल करण्यात येत आहे.
इस्लामपूर एमआयडीसीमध्ये 100 युनिट्स कार्यरत असून यामधून सरकारला कोट्यवधी रुपयांचा कर जमा होत आहे. मात्र महावितरणची वीज दिवसातून चार ते पाचवेळा खंडित होत आहे. ज्यामुळे प्लास्टिक, केमिकल, प्रोसेस इंडस्ट्रीज या उद्योगांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी देऊन सुद्धा काहीही सुधारणा होत नाही. महावितरणला एका युनिटला 14 ते 15 रुपये याप्रमाणे दर देत असून सुद्धा चांगली सेवा मिळत नाही.
एमआयडीसीमधील उद्योजक साखराळे ग्रामपंचायत तसेच एमआयडीसी या दोघांना मिळून घरफाळा हा देत आहेत. परंतु या एमआयडीसीमधील कचरा व्यवस्थापन गेल्या 15-20 वर्षांपासून होत नाही. एमआयडीसी ऑफिस, साखराळे ग्रामपंचायत व जिल्हाधिकारी बैठकीत हे प्रश्न उपस्थित केले व वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा कचरा व इतर अडचणीकडे कोणीही लक्ष देत नाहीत. ग्रामपंचायत साखराळे यांनी लिखित स्वरूपात, कचरा उचलू शकत नाही, असे सांगितले आहे. एमआयडीसीकडे कोणतीही कचरा उचलण्याची व्यवस्था नाही. कोणीही कचरा उचलणार नसतील, तर एमआयडीसीची स्वच्छता कोण ठेवणार ? हा उद्योजकांना प्रश्न पडला आहे. स्थानिक नेत्यांनी यामध्ये लक्ष घालून उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यास मदत करावी, अशी मागणी उद्योजक करीत आहेत. एमआयडीसी कचरामुक्त करण्याची, वारंवार खंडित होणारी विजेची समस्या, खराब झालेले रस्ते, गटारींची व्यवस्था याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी उद्योजकांमधून होत आहे.