सांगली : वाढता कमिशनचा टक्का; सिंचन योजनेला धक्का

सांगली : वाढता कमिशनचा टक्का; सिंचन योजनेला धक्का
Published on
Updated on

कडेगाव : पुढारी वृत्तसेवा : टेंभू सिंचन योजनेच्या दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी केवळ दोन वर्षांतच पाण्यात बुडाला आहे. कमिशनचा वाढत्या टक्क्यानेच सिंचन योजनेला धक्का बसल्याची चर्चा लाभक्षेत्रातील शेतकरीवर्गासह सर्वसामान्य नागरिकांत होऊ लागली आहे.

मुळात टेंभू उपसा जलसिंचन योजना सुरू करण्यात अनंत अडचणी निर्माण झाल्या होत्या.तशाही परिस्थीतीत ही योजना सुरू झाली. युती सरकार व त्यानंतरच्या प्रत्येक सरकारने योजनेसाठी भरघोस आर्थिक नियोजन केले. परंतु, योजना सुरू झाल्यावर ती पूर्ण करण्यापेक्षा 'आर्थिक सिंचनाकडे' काही अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे ही योजना आर्थिक प्रश्नावर लोंबकळत राहिली. अगदी सुरुवातीपासून टेंभू योजना म्हणजे चराऊ कुरण समजून त्याकडे पाहिले गेले. परिणामी टेंभू सिंचन योजना 714 कोटींवरून आज 3 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची झाली. मात्र, योजना काही पूर्णक्षमतेने सुरू झाली नाही.

टेंभू सिंचन योजनेवर ज्या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली, ते अधिकारी स्थानिक पातळीवरील असल्याने आणि त्यांचे संबंध काही राजकीय नेतेमंडळींशी असल्याने त्यावर कोणी तक्रार करण्याचे धाडस केले नाही. तक्रार केली तर त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. योजना कडेगाव तालुक्यात आणि कार्यालय सातारा जिल्ह्यातील ओगलेवाडीला असल्यामुळे या योजनेबाबत काय गौडबंगाल सुरू आहे, हे कुणालाच समजत नाही. ठेकेदारही काही नेते मंडळी आणि संबंधित अधिकारी यांच्या मर्जीतील नियुक्त केल्याने साहजिकच योजनेची वाटचाल रडत खडतच सुरू राहिली. सध्या टेंभू योजनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे .

अस्तरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याने गळती

अनेक ठिकाणी कालव्यामधून पाणी पुढे जाण्यापेक्षा गळती व जमिनीत मोठ्या प्रमाणात मुरत असताना दिसून येते. अस्तरीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची लोकांत चर्चा सुरू आहे. टेंभूचे एक कार्यालय सातारा जिल्ह्यातील ओगलेवाडी येथे तर दुसरे सांगलीत असल्याने याबाबत तक्रार करणार्‍यांचीसुद्धा मोठी पंचाईत होतान दिसत आहे. अस्तरीकरणच्या विविध कामांची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई व्हावी, अशी लोकांची मागणी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news