

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी भाजपमधील इच्छुकांची मोठी संख्या आणि पक्षांतर्गत गट-तट यामुळे उमेदवार निश्चितीचा तिढा कायम आहे. त्यामुळे एका जागेसाठी दोन ते तीन याप्रमाणे संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी आज-गुरुवार, दि. 25 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर होणार आहे. पक्षाचे उमेदवार तसेच घटकपक्षांचे जागावाटप यावर गुरुवारी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांसोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच महापालिका निवडणूक समितीचे पाच सदस्य चर्चा करणार आहेत. उमेदवार निश्चितीसाठी सर्वेक्षण हा घटक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी मुख्यमंत्री निश्चित करणार आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी आज-गुरुवारी मुख्यमंत्र्यांकडे सादर होत आहे. त्यामुळे सांगलीत बुधवारी भाजप कोअर कमिटीची पुन्हा बैठक झाली. आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, माजी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजप नेत्या जयश्री पाटील, नीता केळकर, सुरेश आवटी, धीरज सूर्यवंशी उपस्थित होते.
भाजप उमेदवारांच्या संभाव्य यादीबाबत नेत्यांमध्ये चर्चा झाली. महापालिकेच्या 78 जागांसाठी भाजपकडे 529 इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली आहे. त्यातून संभाव्य इच्छुकांची उमेदवारी यादी तयार करण्यात आली आहे. एका जागेसाठी दोन ते तीन, याप्रमाणे संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. ज्याठिकाणी नेत्यांमध्ये उमेदवारीवरून मतभेद नाहीत, अशा ठिकाणी एका जागेसाठी 2 उमेदवारांची संभाव्य यादी तयार करण्यात आली आहे. ज्याठिकाणी नेतेमंडळी आपापल्या कार्यकर्त्यांसाठी विशेष आग्रही आहेत, त्याठिकाणी एका जागेसाठी 3 नावे सुचविण्यात आली आहेत.
निवडणूक समितीचे सदस्य आ. खाडे, आ. गाडगीळ, इनामदार, देशपांडे, ढंग हे बुधवारी संभाव्य उमेदवारांची यादी घेऊन मुंबईला रवाना झाले. आज-गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावर प्राथमिक बैठक होईल. उमेदवारी यादीवर चर्चा होईल. त्यानंतर दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमोर संभाव्य उमेदवारांची यादी सादर होईल. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच सांगलीहून गेलेले पाच नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे उमेदवारांची यादी अंतिम करणार आहेत. संभाव्य यादी आणि सर्वेक्षण अहवाल यावरून उमेदवार निश्चित होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपमधीलच काही माजी नगरसेवकांनी स्वत:सह कुटुंबांतील अन्य सदस्यांनाही उमेदवारीची मागणी केली आहे. काहींनी प्रभागातील चारही उमेदवार आम्हीच ठरवणार, अशी भूमिका घेत त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीही घेतल्याचे समजते. मात्र याला भाजपमधील काही नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे एका जागेसाठी एक, दोन, तीन यानुसार इच्छुकांची यादी झाली आहे.
स्थानिक नेत्यांमध्ये एकमत होईना..!
भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. सांगली व मिरजेतील काही प्रभागातील उमेदवारीवंरून नेत्यांमध्ये एकमत नसल्याची चर्चा आहे. त्यात जुना-नवा वाद पक्षात सुप्त स्वरुपात आहे. याशिवाय भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्या जयश्री पाटील तसेच पृथ्वीराज पाटील यांना काही जागा देण्याचा शब्द पक्षाने प्रवेशावेळी दिला होता. मात्र आता त्यातील काही जागांबाबत तडजोड करावी, अशी भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना अडचणी येत आहेत.
राष्ट्रवादी स्वतंत्र; शिवसेना, जनसुराज्य, आरपीआयच्या जागांबाबत आज निर्णय
भाजपने महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याची भूमिका घेतली आहे, मात्र अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने मिरजेत स्वतंत्र लढण्याचा पवित्रा घेतल्याचे दिसते. त्यामुळे सध्यातरी महायुतीत राष्ट्रवादी नसेल, अशीच चर्चा आहे. दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार, अशी हवाही सर्वत्र पसरली आहे. दरम्यान, शिवसेना, जनसुराज्य आणि आरपीआयच्या जागांबाबत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होईल, असे सांगण्यात आले.