Sangli Gold Theft : पॉलिशच्या बहाण्याने सोने चोरणारी टोळी जेरबंद

तीन लाखांच्या सोन्याची लगड जप्त : मिरज शहर पोलिसांची कारवाई : देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे
Sangli Gold Theft : पॉलिशच्या बहाण्याने सोने चोरणारी टोळी जेरबंद
Published on: 
Updated on: 

मिरज : सोने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने रासायनिक प्रक्रियेद्वारे सोन्याचे दागिने वितळवून फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या टोळीला मिरज शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून वितळवलेले १८ ग्रॅम वजनाचे सुमारे ३ लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.

दुर्गेशकुमार कृष्णकुमार गुप्ता (वय २७) आणि देवेंद्रकुमार नरेशकुमार गुप्ता (वय ३६, दोघे रा. सोनदिया, ता. गोगडी, जि. खगडिया, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांचे नाव आहे. १७ सप्टेंबररोजी हे दोघे ब्राह्मणपुरी येथील महादेवी शिवराम मोदगे (वय ६४) या वृद्धेच्या घरी गेले होते. त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या पाहून 'आम्ही सोनेही पॉलिश करून देतो’, असे त्यांनी सांगितले. संशयितांनी एका भांड्यात पाणी व पिवळ्या रंगाचे रासायनिक द्रव टाकून त्यात बांगड्या उकळण्यास ठेवल्या. काहीवेळानंतर त्या बाहेर काढून, ‘बांगड्या लगेच हातात घालू नका’, असे सांगून ते रासायनिक पाणी व भांडे सोबत घेऊन निघून गेले.

काही वेळाने महिलेने बांगड्या तपासल्या असता त्यांचे वजन कमी झाल्याचे लक्षात आले. सोनाराकडे जाऊन चौकशी केली असता, ६० ग्रॅम वजनाच्या बांगड्यांचे वजन घटून ४१.६८४ ग्रॅम झाले असल्याचे निदर्शनास आले. रासायनिक द्रवात उकळून त्यांनी सुमारे १८ ग्रॅम सोने वितळवून लांबवले होते. याप्रकरणी मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण चौगले आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक विनायक मसाळे यांच्या पथकाने शहरातील तब्बल ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

संशयितांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून १८ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, रासायनिक द्रव जप्त केला आहे. कारवाईत पोलिस अंमलदार नीलेश कदम, नितीन मोरे, झाकीर काझी, श्रीकांत केंगार, योगेश विटेकरी, आसिफ सय्यद, स्वप्निल नायकोडे यांनी सहभाग घेतला.

साथीदारांचा शोध

अटक करण्यात आलेली ही बिहारी टोळी असून, त्यांचे आणखी काही साथीदार आहेत. या टोळीने देशभरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारे गंडाळल्याचे समोर आले आहे. ही टोळी प्रामुख्याने वृद्ध महिलांना हेरून आपली शिकार बनवत असे. त्यांनी अशा प्रकारे आणखी किती जणांना फसवले आहे, याबाबत मिरज शहर पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news