

तासगाव : राजापूर (ता. तासगाव) येथे एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेस दिराने कुऱ्हाडीने वार केले. याप्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जनाबाई महादेव हजारे (वय ७५, रा. राजापूर, ता. तासगाव) असे जखमी वृद्धेचे नाव आहे. याप्रकरणी दीर रामचंद्र आण्णा हजारे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवार, दि. ७ रोजी दुपारी १२ वाजता जनाबाई या आपल्या शेतात भांगलण करत होत्या. त्या वेळी त्यांचा दीर रामचंद्र हजारे हा शेजारीच शेळ्या चरवत होता. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास रामचंद्र हा जनाबाई यांच्याजवळ आला आणि ‘तू माझ्या शेतात येऊन का काम करत बसतेस?’ असे म्हणत त्याने शिवीगाळ सुरू केली. रागाच्या भरात कुऱ्हाडीने जनाबाई यांच्या डोक्यात थेट वार केला. तसेच उजव्या हाताच्या दंडावर व हाताच्या मधल्या दोन बोटांवर कुऱ्हाडीने मारून त्यांना गंभीर रक्तबंबाळ केले.
कुऱ्हाडीच्या भीषण हल्ल्यानंतर जनाबाई यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. त्या अवस्थेत त्या प्रसंगावधान राखून शेजारी असलेल्या नीलेश हजारे यांच्या घराजवळ पोहोचल्या. तेथे उपस्थित असलेले नीलेश हजारे, सागर हजारे, अनिकेत हजारे व त्यांची सून रूपाली यांनी तातडीने धाव घेत त्यांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. तासगाव पोलिसात संशयित रामचंद्र हजारे याच्यावर गुन्हा दाखल आहे.