

सांगली : समाजा-समाजात भांडणे लावणारा रोज एक नवा विषय दिल्लीत निघतो. त्याला मतदान करायला वेगवेगळी आमिषे दाखविली जातात. पण सांगलीचा डीएनए हा धर्मनिरपेक्ष आहे. पुरोगामी विचार संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप खा. विशाल पाटील यांनी केला. प्रभाग क्रमांक 16 च्या प्रचार सभेत ते बोलत होते.
पुढे खा. पाटील म्हणाले, सांगलीचा डीएनए हा धर्मनिरपेक्ष आहे. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, पतंगराव कदम यांच्या विचारांचा हा जिल्हा आहे. पुरोगामी विचार संपविण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. मागील 15 वर्षांपासून सांगलीचा आमदार भाजपचा, 12 वर्षे खासदार भाजपचा, 9 वर्षे महापालिकेची सत्ता भाजपची; तेव्हा सांगलीचा विकास करायला यांचे हात कोणी बांधले होते का? आज शहरात मोठमोठी विकासाच्या गप्पा मारणारी बॅनर लागली आहेत.
प्रभाग क्रमांक 16 हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. इथल्या प्रत्येकाची काँग्रेससोबत नाळ जोडलेली आहे. गेल्या निवडणुकीत 2 उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. पण यंदा तसे होऊ द्यायचे नाही. इथून काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आज पक्ष सोडून गेलेत. तरी देखील इथली जनता काँग्रेससोबतच आहे. मी असो की विश्वजित कदम, आम्हाला समोरच्या बाजूने आश्वासने आली. आम्ही जनतेचा चेहरा समोर ठेवून विचारांशी ठाम राहिलो. सत्ता येते, जाते. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली आहे. यंदा परिवर्तन अटळ आहे.