Vishal Patil | किती दिवस नेहरू, गांधींचं नाव घेणार?

तुमच्या जबाबदारीवर बोला : खासदार विशाल पाटील भाजपबाबत आक्रमक
Vishal Patil |
सांगली : संसदेत बोलताना खासदार विशाल पाटील.Pudhari Photo
Published on
Updated on

सांगली : पहलगाम हल्ल्याला शंभर दिवस झाले, मात्र अद्याप हल्लेखोर आतंकवाद्यांचं काय झालं कळत नाही. विरोधकांनी प्रश्न विचारला की भाजप सरकार नेहरू आणि इंदिरा गांधी याचं नाव घेतं. काँग्रेसनं काय केलं, असं विचारलं जातं. किती दिवस हे करणार? तुमची उत्तर देण्याची जबाबदारी आहे, त्यावर बोला, अशी आक्रमक भूमिका खासदार विशाल पाटील यांनी संसदेत मांडली.

पहलगाममधील आतंकवादी हल्ला व ऑपरेशन सिंदूर संदर्भातील चर्चेत त्यांनी सहभाग घेतला. ते म्हणाले, सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवले. त्यांना नमन आहे. पाकिस्तान चीनच्या मागे लपला होता. ते म्हणत राहतील, आमचं काही नुकसान झालं नाही, त्यांना म्हणू द्या. आता उत्तर द्यायला हवं की युद्धविराम का केला? ट्रम्प म्हणतात, ‘मी युद्धविराम केला.’ सरकार म्हणतं, ‘आम्ही युद्धविराम केला.’ त्यानंतरही पाकिस्तान हल्ला करत राहतं. प्रश्न आहे की, ‘युद्धविराम कुणी केला.’ युक्रेन युद्ध आपण थांबवलं असेल, तर मग आपल्या युद्धाबाबत आपण निर्णय का घेऊ शकलो नाही.

ते म्हणाले, आपल्या देशात येऊन सामान्य भारतीयांना दहशतवाद्यांनी मारलं. आपल्या गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश नाही का? त्याबाबत कारवाई का झाली नाही. 100 दिवसांनंतरही आतंकवादी मिळत नाहीत, हे सरकारचे अपयश नाही का? आपण कुणाचा राजीनामा मागितला नाही, सारे सरकारच्या पाठीशी उभे राहिले. विदेशात जायला सर्व पक्षांतील लोक पुढे आले. देशाचा आवाज बुलंद केला. आता उत्तर देण्याची सरकारची वेळ आहे. ‘काय झालं, काय चुकलं?’ हे विचारणं देशद्रोह आहे का? आमच्या बहिणींचे कुंकू पुसणार्‍यांना पकडून भारतात आणा, असं म्हणणं चुकीचं आहे का?’, असा सवाल त्यांनी केला.

तरतूद वाढवा

खासदार विशाल पाटील म्हणाले, “सुरक्षा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात 9.5 टक्के वाढ केली आहे. हा निधी पगार आणि निवृत्ती वेतनात खर्च होतो आहे. पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी म्हणते की, अर्थसंकल्पाच्या तीन टक्के खर्च सुरक्षा व्यवस्थेसाठी गरजेचा आहे. तो दोन टक्के होतोय. त्यात पन्नास टक्के वाढीची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news