Sangli District Bank Election : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अर्जाविरोधात न्यायालयात धाव

जिल्हा बँक निवडणूक; सावंत, शिंदे यांच्याकडून कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका
Sangli district bank
Sangli district bankPudhari
Published on: 
Updated on: 

​सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील जत तालुक्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा (अ) सोसायटी गटातील लढत आता थेट न्यायालयात पोहोचली आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्याच्या जिल्हा सहकार उपनिबंधकांच्या निर्णयाला आव्हान देत माजी आमदार विक्रम सावंत आणि बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. त्यामुळे उच्च न्यायालय काय निर्णय देणार आणि पडळकर यांची उमेदवारी कायम राहणार की धोक्यात येणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहकार उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी पडळकर यांच्या उमेदवारी अर्जावर घेण्यात आलेली हरकत फेटाळून लावत त्यांचा अर्ज वैध ठरवला होता. मात्र या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत सावंत व शिंदे यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. पडळकर यांनी २० फेब्रुवारी २०२६ रोजी कुणीकोणूर येथे जमीन खरेदी केली आहे; मग त्यापूर्वीच ते संबंधित संस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी किंवा जमीनधारक कसे ठरले, असा सवाल याचिकेत विचारण्यात आला आहे. याशिवाय निंबवडे पतसंस्थेचे कार्यक्षेत्र केवळ निंबवडे गावापुरतेच मर्यादित असल्याने पडळकर यांचे तिथले सभासदत्व आणि संचालकपद दोन्ही नियमबाह्य असल्याचा ठाम दावा सावंत आणि शिंदे यांनी केला आहे.

जिल्हा सहकार उपनिबंधकांनी हरकत फेटाळल्यानंतर आता हा वाद थेट उच्च न्यायालयात गेल्याने या कायदेशीर लढाईला मोठे वळण मिळाले आहे. कोल्हापूर सर्किट बेंच यावर काय भूमिका घेते आणि निवडणूक प्रक्रियेवर याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news