Sangli DCC Bank| आ. गोपीचंद पडळकर यांचे उमेदवारी दावे खोटे

विक्रम सावंत, सुजय शिंदे; निवडणुकीतील अर्जावर सक्षम पुराव्यानिशी आक्षेप
Sangli district bank
Sangli district bankPudhari
Published on: 
Updated on: 

सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जत तालुक्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा (अ) मतदारसंघातून अर्ज दाखल करताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोडलेले सभासदत्व आणि अनुभवाचे दावे खोटे असल्याचा आरोप माजी आमदार विक्रम सावंत व बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांनी केला आहे.

सोमवारी छाननीवेळी जिल्हा उपनिबंधकांकडे या प्रकरणी हरकत दाखल करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक व बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब, महादेव अंकलगी आदी उपस्थित होते.

सावंत म्हणाले, बँकेच्या उपविधीतील नियम ३५-२-अ-२ नुसार उमेदवाराने प्रतिनिधित्व करत असलेल्या संस्थेचा किमान दोन वर्षे सभासद असणे अनिवार्य आहे. तसेच किमान एक वर्ष कोणत्याही सहकारी संस्थेच्या व्यवस्थापक समितीवर काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे. या नियमांची पूर्तता करण्यासाठी पडळकर यांनी 'कुणीकोणूर सर्वसेवा सहकारी सोसायटी'चे दोन वर्षांपूर्वीपासूनचे सभासदत्व आणि 'निंबवडे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था'मधील संचालक पदाचा अनुभवाचा दाखला सादर केला आहे. मात्र, हे दोन्ही दावे नियमबाह्य आहेत.

कृषी पतसंस्थांच्या आदर्श पोटनियमातील प्रकरण ६, कलम ३ नुसार संबंधित संस्थेच्या कार्यक्षेत्रात कायमचा रहिवासी असणे किंवा किमान १० आर शेतजमीन असणे बंधनकारक असते. पडळकर यांनी २० फेब्रुवारी २०२६ रोजी कुणीकोणूर येथे जमीन खरेदी केली असून, त्यापूर्वी तेथील रहिवासी किंवा जमिनीचे मालक नसल्याने त्यांचे दोन वर्षांचे सभासदत्व अशक्य ठरते. जर त्याआधी सभासदत्व दिले गेले असेल, तर ते बेकायदेशीर आणि रद्दबातल होण्यास पात्र ठरते.

निंबवडे पतसंस्थेचे कार्यक्षेत्र केवळ निंबवडे गावापुरते मर्यादित असून, पडळकर तेथील रहिवासी नसल्याने ते तेथील सभासद किंवा संचालक होऊ शकत नाहीत. दोन्ही संस्थांच्या मागील दोन वर्षांच्या लेखापरीक्षण अहवालातील सभासद यादीत पडळकर यांचे नाव नाही, असे पुरावे सुनावणीदरम्यान सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ​जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांची मातृ-संस्था असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या गोपीचंद पडळकर यांचे दावे लबाडी आणि खोटेपणावर आधारलेले आहेत, असेही सावंत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news