

कवठेमहांकाळ ः बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे यल्लमादेवी यात्रेनिमित्त रविवार, दि. 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीत अपघात होऊन एका प्रेक्षकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रशासनातर्फे नायब तहसीलदार संजय गजानन पवार (वय 53, रा. विश्रामबाग, मिरज) यांनी कवठेमहांकाळ पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी ः फिर्यादीच्या तक्रारीनुसार, नामदेव पोपट पाटील (रा. बोरगाव) यांनी 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते रात्री 11.30 या वेळेत बोरगाव येथील कोड्याचा माळ परिसरातील गट क्र. 746, 747 व 748 येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. यावेळी उपविभागीय दंडाधिकारी, मिरज यांनी दिलेल्या परवानगीतील अटी व शर्तींचा भंग झाल्याचे निदर्शनास आले आहे. शर्यतीच्या मैदानाच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग व प्रेक्षकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता ही शर्यत आयोजित करण्यात आली. या निष्काळजीपणामुळे शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात अंबाजी शेखू चव्हाण (वय 60, रा. करांडेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नायब तहसीलदार संजय पवार यांच्या तक्रारीनुसार कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.