

ईश्वरपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत सन्मानपूर्वक जागा मिळाल्या, तर महायुती म्हणून लढा. नाही तर आघाडी करून पक्षाच्या चिन्हावर लढा. निवडणुकीनंतर काय निर्णय घ्यायचा ते पाहू. मात्र निवडणुकीदरम्यान एकमेकांवर टीका-टिपणी करणे टाळा, असा सल्ला राष्ट्रवादी पक्षाचे नेते, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
वाघवाडी (ता. वाळवा) येथे आयोजित राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, जिल्हा बँकेचे संचालक रणधीर नाईक, महिला जिल्हाध्यक्षा वंदना कांबळे, तालुका अध्यक्ष केदार पाटील, रघुनाथ पाटील प्रमुख उपस्थित होते.
हसन मुश्रीफ म्हणाले, शिवाजीराव नाईक, निशिकांत पाटील यांच्यामुळे वाळवा-शिराळा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे. येथे पक्षाचा विस्तार करण्यास मोठी संधी आहे. निशिकांत पाटील जिल्हाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांना पक्षात घेतले आहे. शिवाजीराव नाईक यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व पक्षाला मिळाले आहे. त्याचा फायदा करून घ्यायला हवा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा मिळत असतील, तर महायुतीतून लढा. नाही तर निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर दिला आहे.
शिवाजीराव नाईक म्हणाले, आगामी निवडणुकीत जिथे जुळेल तिथे जुळवून घेऊ. नाही जुळले तर स्वतंत्र लढू. सन्मानपूर्वक वागणूक मिळत असेल तर आम्ही महायुती म्हणून त्यांच्यासोबत जाण्यास तयार आहोत. शिराळा नगरपालिकेची निवडणूक आम्ही घड्याळाच्या चिन्हावरच लढवणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काम पाहून त्यांच्या पक्षात जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून शिराळा, वाळवा तालुक्यांसह जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, आम्हाला सोबत घेतल्याशिवाय तुमचा जिल्हा परिषदेचा अध्यक्षही होणार नाही. आम्हाला कोणी कमजोर समजू नये. वेळ आली तर स्वबळावर निवडणूक लढवण्याची आम्ही तयारी केली आहे. शिवाजीराव नाईक यांच्यासारखे नेतृत्व पक्षाला मिळाले आहे. नाही तर आमच्या तालुक्यात विश्वासघातकी नेतृत्व आहेच. विधानसभा निवडणुकीत त्यांचे लाखाचे बारा हजार आम्ही केले आहेत. पुढील निवडणुकीत बारा हजाराचे शून्य नक्की करू.
रणधीर नाईक म्हणाले, आम्ही कधीही विश्वासघातकी राजकारण केले नाही. त्यामुळे या निवडणुकीत एकत्रित यायचे असेल, तर विश्वासाने एकत्रित येऊ. नाही तर दिवसा एक व रात्री एक, अशी पाठीत खंजिर खुपसण्याची आमची प्रवृत्ती नाही. तुम्ही सोबत आला तर तुमच्यासोबत, नाही तर तुमच्याशिवायही निवडणूक लढवू. स्वाभिमान गहाण ठेवून आम्ही कोणासोबत जाणार नाही. यावेळी अजितराव घोरपडे, वंदना कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. बाजार समितीचे संचालक सी. एच. पाटील यांनी स्वागत केले. शहाजी पाटील, विजय मुळीक, चंद्रकांत पाटील, सीमा कदम, नेहा सूर्यवंशी, अशोक पाटील, दादासाहेब पाटील, तशीन आत्तार, रूपाली शिंदे, दिलीप पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.