Vedant murder case : वेदांतच्या मारेकऱ्यांना फाशी द्या

सांगलीत कॅन्डल मार्च : जिल्ह्यातील गुंडगिरी मोडीत काढण्याची मागणी
Vedant Bandgar murder case
सांगलीत कॅन्डल मार्च
Published on
Updated on

​सांगली : आरग (ता. मिरज) येथील मालधक्क्यावरील ठेकेदारीचा वाद आणि खंडणीप्रकरणातून १४ वर्षीय वेदांत मारुती बंडगर या निष्पाप बालकाचा बळी गेला. या घटनेमुळे सांगली जिल्हा संतप्त झाला असून वेदांतच्या मारेकऱ्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे आणि जिल्ह्यातील गुंडगिरी कायमची मोडीत काढली पाहिजे, या मागणीसाठी विविध सामाजिक व हमाल संघटना आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत विश्रामबाग परिसरात मूक कॅन्डल मार्च काढला.

विश्रामबाग येथील शहीद अशोक कामटे चौकापासून सायंकाळी या मूक कॅन्डल मार्चला सुरुवात झाली. हातात मेणबत्त्या आणि ‘कायदा सुव्यवस्थेचा अंत.. बळी गेला वेदांत’ असे फलक घेऊन हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. हा मार्च विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानासमोर आल्यानंतर त्याचे रूपांतर श्रद्धांजली सभेत झाले. यावेळी उपस्थितांनी ‘वेदांतच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. या मार्चमध्ये वेदांतचे वडील मारुती बंडगर, हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांच्यासह संपूर्ण बंडगर कुटुंब सहभागी झाले होते.

यावेळी झालेल्या श्रद्धांजली सभेत बोलताना आंदोलकांनी प्रशासनाला धारेवर धरले. बीडचे राजकुमार गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रा. पद्माकर जगदाळे, भयमुक्त-नशामुक्त अभियानाचे निमंत्रक व मनसेचे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत, ज्योती आदाटे, हमाल पंचायतचे विकास मगदूम, सतीश साखळकर आणि भाजप नेते पृथ्वीराज पवार आदींची भाषणे झाली. सांगली जिल्हा भयमुक्त करावा आणि या गुन्ह्यातील सर्व दोषींवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी सर्वांनी केली.

या कॅन्डल मार्चला शैलेश पवार, वि. द. बर्वे, कुलदीप देवकुळे, लालू मेस्त्री यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, हमाल माथाडी कामगार आणि सांगलीकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हमाल बांधव रस्त्यावर उतरणार

हमाल माथाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे यांनी पोलिस प्रशासनावर तीव्र ताशेरे ओढले. ते म्हणाले, ‘गुंडगिरीच्या मुसक्या आवळण्याची प्राथमिक जबाबदारी पोलिसांची असते. जत पोलिसांनी सुरुवातीला झालेल्या गोळीबाराच्या घटनेची तक्रार नोंदवून घेण्यास कमालीचा विलंब केला. पोलिसांच्या याच ढिसाळ कारभारामुळे गुंडांची ताकद वाढली आणि त्यांनी एका कोवळ्या बालकाचा खून करण्यापर्यंत मजल मारली. वेदांतच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी, यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, न्याय न मिळाल्यास राज्यभरातील हमाल बांधव रस्त्यावर उतरतील, असा इशारा त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news