

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली-मिरज रस्त्यावरील रिलायन्स ज्वेल्सवर रविवारी भरदिवसा दरोडा टाकणार्या टोळीने सुमारे 15 कोटी रुपयांची लूट केल्याचे सोमवारी निष्पन्न झाले. यामध्ये केवळ 47 हजारांची रोकड आहे, तर इतर सोन्याचे दागिने व हिरे आहेत. दरोडा टाकल्यानंतर टोळीने पळून जाण्यासाठी वापरलेली दुचाकी व कार मिरजेतील समतानगर व भोसे (ता. मिरज) येथे एका शेतात सापडली आहे. कारमध्ये दोन रिव्हॉल्व्हर व आधारकार्ड सापडले. दरम्यान, या दरोड्याचा छडा लावण्यासाठी आठ पथके नियुक्त केल्याचे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी दैनिक 'पुढारी'स सांगितले.
सांगली-मिरज रस्त्यावर मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीत रिलायन्स ज्वेल्स ही सराफ पेढी आहे. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आठ जणांच्या टोळीने पेढीवर दरोडा टाकला. कर्मचार्यांचे हात-पाय बांधले. याचदरम्यान एक ग्राहक खरेदीसाठी आला होता. दरोडेखोरांच्या हातातील रिव्हॉल्व्हर पाहून या ग्राहकाने काचेचा दरवाजा उघडून पलायन केले. तो बाहेर दंगा करेल या भीतीने टोळीतील एकाने या ग्राहकाच्या दिशेने गोळीबार केला. नेम चुकल्याने हा ग्राहक बचावला. मात्र, पेढीच्या काचेच्या दरवाजाचा चक्काचूर झाला होता. या घटनेनंतर दरोडेखोरांच्या शोधासाठी जिल्ह्यातील संपूर्ण पोलिस यंत्रणा रस्त्यावर उतरली होती. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांत नाकाबंदी केली होती. पेढीसमोरील सीसीटीव्ही कॅमेर्यात दरोडेखोरांची कार व दुचाकी (पल्सर) कैद झाली होती. कार (एमएच 04 ईटी-8894) भोसे येथे एका शेतात सापडली. पेढीतील कॅमेर्यात कैद झालेली हीच कार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी कारची झडती घेतली. त्यावेळी यामध्ये दोन रिव्हॉल्व्हर, जकात पावत्या व आधारकार्ड सापडले. ही कार टोळीने काही दिवसापूर्वी पुण्यातून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. दुचाकीही कर्नाटकातून चोरली आहे. सध्या ही दुचाकी दोन व्यक्तींच्या नावावर आहे. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या तपासाची दिशाभूल करण्यासाठी कदाचित आधारकार्ड ठेवल्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मिरजेत रेल्वे स्टेशनजवळ समतानगर येथे दुचाकी सापडली. ही दोन्ही वाहने जप्त केली आहेत. दरोडेखोर कर्नाटकातील असण्याची शक्यता आहे. भोसेतून दुसरे वाहन घेऊन त्यांनी पलायन केले असावे, असा संशयित आहे. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधला आहे.
दरोडाप्रकरणी पेढीचे व्यवस्थापक महेश सूर्यवंशी-साबळे (37, रा. करंजी, जि. सातारा, सध्या खणभाग, लाळगे गल्ली, सांगली) यांनी फिर्याद दाखल केली आहे. 14 कोटी 69 हजार तीनशे रुपयांचा ऐवज लुटल्याचे साबळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये केवळ 44 हजार तीनशे रुपयांची रोकड व 25 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आहेत. इतर सर्व सोन्याचे दागिने व हिरे आहेत.
कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दरोड्याच्या तपासाचा सोमवारी आढावा घेतला. याचा छडा लावण्यासाठी परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्यांची अधिक कुमक त्यांनी दिली आहे. एकूण आठ पथके तपास करीत आहेत. ही पथक जिल्ह्याबाहेर आहेत. तांत्रिक मुद्याच्या आधारे तपासाला दिशा दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासले जात आहे.
टोळीने दोन-तीन महिने सांगलीत मुक्काम केला असण्याची शक्यता आहे. संपूर्ण रेकी करूनच त्यांनी दरोडा टाकल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांना स्थानिक गुन्हेगारांची 'रसद' मिळाली असण्याची शक्यता आहे. नाशिक येथे काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे दरोडा पडला होता. यामधील गुन्हेगार सध्या कुठे आहेत, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक नाशिकला रवाना झाले आहे. सर्व दरोडेखोर कारमधून पसार झाले. एकटाच दुचाकीवरून का गेला? असा तपासात प्रश्न निर्माण झाला आहे. कदाचित तो स्थानिक असावा. त्यांना रस्ता दाखविण्यासाठी तो पुढे गेला असावा, असाही अंदाज बांधला जात आहे.
सांगली-मिरज रस्त्यावर रविवारी रिलायन्स ज्वेल्स पेढीवर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून कोट्यवधींची लूट केल्याच्या घटनेची गृहमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दरोड्याचा गतीने तपास करून लवकरात लवकर गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली. सांगली येथे घडलेल्या घटनेबाबत पालकमंत्री खाडे यांनी मुंबई येथे सोमवारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. पोलिस प्रशासनाला योग्य ती कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश व्हावे, अशी विनंती केली.