

मिरज; पुढारी वृत्तसेवा : दहा लाख रुपये सावकारी कर्जाच्या मोबदल्यात तीस लाख रुपये वसूल करून, आणखी 42 लाखांची मागणी करून प्रेम मदनानी या व्यापार्यास फायटरकडून जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये प्रेम मदनानी हा जखमी झाला. याप्रकरणी प्रेम याने धोंडिराम घोडके, विशाल घोडके व विश्वेश घोडके या पिता-पुत्रांविरुद्ध शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. तिघांविरुद्ध बेकायदा सावकारीचा गुन्हा दाखल आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रेम हा मित्रांसमवेत मिरजेत विसर्जन मिरवणुकीत गेला होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्या विश्वेशने प्रेम याला मिरवणुकीतून बाजूला खेचून फायटरने मारहाण केली. त्याच्याकडे दहा लाख रुपयांच्या मोबदल्यात घोडके याने त्याच्यासह भाऊ व वडिलांच्या कर्जापोटी एकूण 42 लाख रुपयांची मागणी केली. यावेळी प्रेम याच्या कपाळावर फायटरने मारहाण करण्यात आली. जखमी प्रेम याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केलेे. त्याने घोडके पिता-पुत्रांकडून दहा लाख रुपये 15 टक्के व्याजाने घेतले होते. या कर्जापोटी पाच वर्षात प्रेम याच्याकडून तिघांनी 30 लाख रुपये वसूल केले. मात्र आणखी 42 लाखांच्या वसुलीसाठी या पिता-पुत्रांनी कोरे धनादेश, बाँड घेतले. त्यानंतर पुन्हा वसुलीसाठी दमदाटी, मारहाण केल्याचे प्रेम याने तक्रारीत म्हटले आहे.