सांगलीत ‘गुंडाराज’…भरदिवसा मुडदे!

सांगलीत ‘गुंडाराज’…भरदिवसा मुडदे!
Published on
Updated on

सांगली; सचिन लाड :  टोळीयुद्ध… हे सांगलीकरांना नवीन राहिलेले नाही. एकमेकांचा बदला घेण्यासाठी काही टोळ्या सुडाने पेटल्या आहेत. आठवड्याभरात सांगलीत तिघांचा मुडदा पडला. तडीपार गुंड पुन्हा येथे आश्रयाला येऊन गुन्हेगारी कारवाया करीत असल्याने शहरात 'गुंडाराज' असल्याचे गुन्हेगारीवरून दिसून येते.

महिलेसह तिघांचा 'मुडदा'!

'मिसरूड'देखील न फुटलेल्या पोरांच्या कंबरेला कोयते दिसत आहेत. नवनवीन गुन्हेगार 'रेकॉर्ड'वर येत आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी या गुन्ह्यांची मालिकाच सुरू आहे. गेल्या आठवड्यात वानलेसवाडी येथे महिलेचा घरात घुसून कोयता व सत्तूरने सपासप वार करून खून केला. ही घटना ताजी असतानाच माधवनगर रस्त्यावर साखर कारखान्याच्या गेटमध्ये महाविद्यालयीन तरुणाचा कोयत्याचा हल्ला करून मुडदा पाडला. दोनच दिवसापूर्वी कुपवाड येथे बामणोली गावच्या कमानीजवळ तडीपार गुंडाचा खून करण्यात आला.

पोरांचं आयुष्य अंधारमय!

वानलेसवाडीत महिलेच्या खुनात तीन अल्पवयीन मुले सापडली. कारखान्याजवळ झालेल्या खुनात 19 ते 19 वयोगटातील पाच हल्लेखोरांना अटक झाली. सहा महिन्यापूर्वी माधवनगर ते पद्माळे फाट्यावर एका महाविद्यालयीन तरुणाचा खून झाला होता. यामध्ये 19 वयोगटातील तीन पोरं सापडली. कोवळ्या वयात पोरांची पावले गुन्हेगारीकडे वळू लागल्याने हा एक चिंतेचा विषय बनला आहे. गांजा व नशेच्या गोळ्यांचे सेवन करून कोणताही गुन्हा करण्यास ही पोरं मागे-पुढे पाहत नसल्याचे घटनांवरून दिसून येते.

गुन्ह्यांची मालिकाच!

'मॉर्निंग वॉक' व बाजारात निघालेल्या महिलांचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून पळविले जात आहेत. शेतात काम करणार्‍या महिला 'टार्गेट' करून शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील दागिने लंपास केले जात आहेत. मध्यवर्ती बसस्थानकावर महिलांच्या टोळ्या सक्रिय आहेत. वाहनातून पेट्रोल व डिझेल चोरीचे प्रमाण वाढले आहे.

कारागृह झाले हाऊसफुल्ल!

वाढत्या गुन्हेगारीमुळे अनेक नवनवीन गुन्हेगार रेकॉर्डवर येत आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाही अनेक गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहेत. सांगलीचे कारागृह 'हाऊसफुल्ल' झाले आहे. साडचारशेहून अधिक कच्चे कैदी आहे. बहुतांश हे कैदी खून व खुनी हल्ल्याच्या घटनांमधील आहेत.

हत्येला महिना पूर्ण : सूत्रधार कुठाय?

जत येथील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या झाली. या घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे. तरीही सूत्रधार मोकाटच आहे. गोळ्या झाडणारे रेकॉर्डवरील तीन गुन्हेगार लगेच सापडले. मात्र, सूत्रधार सापडत नसल्याने ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. सूत्रधाराचा सुगावा काढण्यासाठी आतापर्यंत शेकडो जणांची चौकशी झाली. तरीही पोलिस यंत्रणेच्या हाती काहीच लागलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news