Sangli Crime: रागासोबत दारू चढली, पोटच्या पोरीला लटकवून मारली

Sangli Latest News in Marathi: सोडवला तर कोयत्यानं तोडीन... दहशतीनं यमगर वस्ती अजूनही सुन्न
sangli crime
sangli crimePudhari
Published on
Updated on

नंदू गुरव

सांगली : माप सांगितलं की वो पोराला, दारू पिऊ नगं... दारू पिऊ नगं... पर त्यो ऐकतोय काय कुणाचं? मनात आलं की निगाला रोजगाराला, आला रोजगाराचा पैसा की पेली दारू... रात-दिस दारू प्यायचा वो आन्‌‍ पिला की कुणाच्या बाचं ऐकायचा नाय. ऐकून घ्याचं ठावंच नाय त्येला. त्याची पाच-पाच पोरं आम्ही म्हाताऱ्यांनी दिस-रात काबाडकष्ट करून सांभाळली. पर यानं कवा रुपाया दिला नाय संसाराला... आन्‌‍ आज दारूनंच घात केला वो. पोरीस्नी हात-पाय बांधून लटकावलं. रातभर पप्पा... पप्पा... मम्मी... मम्मी... करून वरडत हुत्या; पाणी मागत हुत्या... पर ‌‘सोडवला तर कोयत्यानं तोडीन...‌’ म्हणून धमक्याच देत हुता. घाबरलोवतो वो आमी... संपलं सारं... काय बोलावं आता... काय सांगावं..?

वाघागत असलेली शेवंताबाई आणि हैबतीमामा, पर आज मेल्यागत गप्प बसले होते. पलीकडं भिंतीला टेकून अवसान गेल्यागत पोरांची आई बसली होती. रात्रीची नवऱ्याची दहशत, दोरीनं बांधून लटकावलेल्या पोरी, त्यांनी पाणी दे... पाणी दे... म्हणून मारलेल्या हाका आणि पाणी दिलं तेव्हा मान टाकलेली पोरगी... राणी सुन्न झाली होती. दारू पिऊन हैवान झालेल्या तिच्या नवऱ्यानं पोटच्या पोरीचा बळी घेतला होता. एव्हाना पोरींवर चोरीचा संशय घेतल्यानं दादू यमगरनं सानिका आणि अनुजाला लटकावून मारलं. त्यात सानिकाचा जीव गेल्याची बातमी पंचक्रोशीत वाऱ्यागत पसरली होती. शेजारच्या वस्तीवरच्या आयाबाया भाकरतुकडा घेऊन येत होत्या, विचारत होत्या. काय सांगणार त्यांना?

sangli crime
Crime News: भररस्त्यात पत्नीचा गळा चिरला, मग अंगावर घातली कार; बारामतीच्या लेकीचा कर्नाटकात करुण अंत, थरारक व्हिडिओ समोर!

शेवंताबाईनी कसाबसा धीर गोळा केला. म्हणाल्या, पोरी लय घाबरत हुत्या बापाला. चोरी करत्यात म्हणून बानं दोरानं बांधून घातलं. वर अँगलला टांगलं. आत येऊच दिना कुणाला. पोरी रातभर मम्मी... मम्मी... पप्पा... पप्पा... म्हणून वरडत होत्या. आदल्या दिवशी बापाच्या अंगावर गेलता. जोरात भांडणं झाली. म्हणून घाबरून आमी आत गेलो नाय. पहाटे उठून त्यो भाईर गेल्यावर मगच पोरीचा आज्जा आत गेला, तर पोरी तशाच लोंबकळत हुत्या. आमी सारी आत आलो. पोरींना खाली उतरवलं, पाणी पाजलं, तर सानिका पिना. जीव घाबरा झाला. मग कुणाला तरी बोलावलं... गाडीतनं दवाखान्यात नेलं... पर पोरगी गेलीच की वो... असं म्हणत आटल्या डोळ्यानं त्या गप बसल्या.

पोरांची आई तर अजूनही धक्क्यातनं सावरलीच नव्हती. आयाबाया विचारत होत्या. सांगत होती... 14 वर्सं झाली संसाराला. पोटाला पाच पोरं झाली, पण यांची दारू काय सुटली नाय. दारूनं घात केला. तुमच्या पोरीनी अमुक चोरलं तमुक चोरलं... म्हणून तक्रारी यायच्या, म्हणून रागानं पोरींचं हात-पाय बांधून घातलं. पोरीस्नी सोडा म्हणून लय प्रयत्न केला, पर कुणाचं काय ऐकूनच घेत नव्हतं. सोडला तर बगा म्हणत खोलीतच बसलंवतं. रात्री सात-आठ वाजता टांगलेल्या पोरी... पहाटे हे गावात गेल्यावरच खाली सोडल्या. पण तोवर संपलंवतं सगळं.

sangli crime
Sangli crime : बापाकडून दोन चिमुरडींना जबर मारहाण; एकीचा मृत्यू

एरवी गावाच्या बाहेर, म्हाकुबाईच्या देवळाजवळ, शांत शांत असलेली यमगर वस्ती... आज पण शांतच होती, पण ही शांतता भयानक होती. माणसं येत होती, जात होती. पोलिस, फॉरेन्सिक लॅबवाले आपलं काम करत होते. बनपुरीकरांना हे आपल्या गावात असं काय झालं, असा सवाल पडला होता. माणसं संताप व्यक्त करत होती आणि इकडं यमगर वस्तीवर एक हतबल आई, हात टेकलेला बाप, आपल्याच नवऱ्याला हैवान झालेलं बघितलेली बायको आणि नेमकं काय झालंय ते धड न समजलेली सानिकाची बहीण व भाऊ कावरीबावरी होऊन गर्दीकडं बघत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news