

सांगली-हरिपूर रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. केवळ तीन किलोमीटरच्या या रस्त्याचे मालक कोण आणि या रस्त्यामुळे त्रस्त सामान्यांना वाली कोण? हा प्रश्न आहे.
सांगली-हरिपूर हा डांबरी रस्ता सुंदर असताना तो काँक्रिटचा बनविण्याचा घाट का घातला? या रस्त्याच्या कामाला काही डेडलाईन आहे की नाही? रस्त्याची लांबी साडेतीन किलोमीटर आहे. हरिपूर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन 3 जून 2022 रोजी झाले. त्यानंतर काम सुरू होण्यास तब्बल सहा महिने विलंब झाला. त्यानंतरही काम कासवगतीनेच सुरू राहिले.
सांगली-हरिपूर या केवळ तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल 12 कोटींची निविदा एका खासगी कंपनीने मिळवली. त्यांनी गतीने म्हणजे कार्यारंभ आदेश (वर्कऑर्डर) मिळाल्यानंतर चार महिन्यांनी काम सुरू केले. या कामाला एक वर्षाची मुदत मिळाली. मात्र अवघ्या तीन-साडेतीन किलोमीटर लांबीचा हा रस्ता तीन वर्षानंतरही का पूर्ण होऊ शकला नाही?
या रस्त्याच्या रखडलेल्या कामाने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी उखडलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात बसून या कामाचा वाढदिवस साजरा केला, तरीही कोणाला काही सोयरसुतक नाही. या कामासाठी पहिली मुदतवाढ सहा महिन्यांची देण्यात आली. मुदतवाढ मिळवली म्हणजे बारा कोटीत किती वाढले? हाही प्रश्न आहे. ही मुदतवाढ 19 मार्च 2025 पर्यंत होती. त्यासाठी हरिपूरमध्ये गतवर्षी अतिवृष्टी, महापूर आल्याचा जावईशोधही अधिकार्यांनी लावला आहे. शोधली की कारणे सापडतात. आता येत्या जुलैमध्ये श्रावण सुरू होईल. श्रावणात हरिपूरच्या संगमेश्वर देवाची प्रत्येक सोमवारी यात्रा भरते. त्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते.
यात्रेस प्रारंभ होण्यापूर्वी हा रस्ता होईल का? कारण अनेक लोक श्रावण सोमवारच्या यात्रेवर उदरनिर्वाह करीत असतात. मागीलवर्षी या व्यावसायिकांचे, यात्रेकरूंचे प्रचंड हाल झाले होते. सध्या या रस्त्यावरून जाणे म्हणजे मोठी कसरत ठरत आहे. अवकाळी पावसाने तर नव्या रस्त्यावर तळे साचले आहेच, पण जुन्या रस्त्याचा काही भागही खोदून ठेवला आहे. येथे तर जलतरण तलावच बनला आहे. या रस्त्यावर रात्री जा-ये करणे म्हणजे जिवाची बाजीच लावणे. कारण रस्त्यावर पथदिवेच नाहीत. चिखल भरलेला रस्ता, रस्त्याच्या बाजूला खड्डे, खड्ड्यांमध्ये पाण्याचे तळे, अशा स्थितीमुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होतो आहे.
आता एकाच पावसात या रस्त्यावर तळे साचले आहे. रस्त्याचे काम गतीने आणि दर्जेदार करा. योग्य काम झाले नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा हरिपूरच्या ग्रामस्थांनी दिला आहे.
रस्त्यावरून जा-ये करणे अत्यंत बिकट झाले आहे. खड्डे आणि चिखल यातून जाणे म्हणजे भलतीच कसरत. लवकरात लवकर रस्ता झाला नाही, तर चिखलात बसून आंदोलन करणार आहोत.
पंकज आळवेकर, उद्योजक, हरिपूर
माहितीच्या अधिकाराखाली मागितलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे मिळत नाहीत. अनेक त्रुटी व अनेक कमतरता या रस्त्याच्या बाबतीत आहेत. रस्त्याकडेला गटारी नाहीत. पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही सोय नाही.
शिवाजी मोहिते, काँग्रेस नेते, हरिपूर