

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका स्थापन होऊन 27 वर्षे पूर्ण झाली. या काळात मतदार संख्या सव्वा लाखाहून वाढून आता साडेचार लाखाहून अधिक झाली आहे. मतदार आज सहाव्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात असताना, पूर्वीचेच आहेत तेच प्रश्न मात्र नव्या बॉडीपुढे आहेत. विशेष म्हणजे याच प्रश्नावर प्रचारात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शेरीनाला, वारणा उद्भव योजना, उद्याने, नाट्यगृह, हद्दवाढ, प्रशासकीय इमारत, शहरी बस व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, शुध्द पुरेसे पाणी आदी प्रश्न मात्र आहेत तसेच आहेत.
1975 साली टायफाईडची साथ आली. यावेळी शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळू न देण्याबाबत निर्णय झाला. कारखान्यांचे पाणी मिसळू न देण्याबाबतही निर्णय झाला. यासाठी नाल्याचे पाणी पिण्याच्या पाणी उपसा पंपाच्या पुढे सोडण्याचा निर्णय घेऊन उपाययोजना करण्यात आल्या. मात्र हे पाणी आजही नदीत मिसळतच आहे. या प्रश्नावर केवळ महापालिकाच नव्हे, तर विधानसभेच्याही निवडणुका झाल्या आहेत. वारणा धरणाच्या बॅक वॉटरमधून सांगलीला शुध्द पाणी देण्याचा प्रश्नही 27 वर्षे जुना आहे. सध्या शहरी बस वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. मागणीच्या तुलनेत वीस टक्केही बससेवा नाही. ही सेवा महापालिकेकडे देण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. गेल्या दोन वर्षात याचे केंद्रही अजून उभारले नाही.
महापालिका हद्दवाढीचा प्रश्नही तसाच पडून आहे. महापालिका क्षेत्राच्या आजुबाजूची गावे महापालिकेच्या सुविधांचा लाभ घेत असताना, त्यांचा समावेश मात्र अजून झालेला नाही. यामुळे एकाच बाजूला शहराची वाढ झाली आहे. चोहोबाजूने हद्दवाढ झाल्यास प्लॉटचे दर सामान्यांच्या आवाक्यात येण्यास मदत होणार आहे. समांतर शहर विकास होण्यास मदत होणार आहे.
महापालिका प्रशासकीय इमारत उभारण्याचा प्रश्नही तसाच आहे. विजयनगरमध्ये यासाठी जागा आरक्षित असताना, याकडे निधीअभावी दुर्लक्ष झाले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. अरुंद रस्ते, पार्किंगला जागा नाही, हा प्रश्न तीस वर्षांपासून तसाच आहे. सांगली ही नाट्यपंढरी समजली जाते. मात्र महापालिकेचे एकही नाट्यगृह नाही. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह बंद पडून जवळपास वीस वर्षे झाली. शहरात आता उंच इमारती होत असताना, अग्निशामक दलाकडे त्या तुलनेत मशिनरी, सुविधा नाहीत.