

Unseasonal Rain Pomegranate Crop Damage
आटपाडी : आटपाडी तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि मुसळधार पावसाने मोठा हाहाकार उडवला. नांगरेमळा, भिंगेवाडी, लिंगेवस्ती, पिंजारवस्ती आणि साठेनगर परिसरातील डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे वर्षभराचे श्रम काही क्षणांत वाया गेले. वादळी वाऱ्यामुळे अनेक डाळिंबाची झाडे मुळासकट उन्मळून पडली, तर झाडांवरील फळे जमिनीवर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
वादळामुळे अनेक ठिकाणी वीज पोल कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला. या संकटानंतर आज सकाळी आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. उद्ध्वस्त झालेल्या बागा पाहताना अनेक शेतकरी भावुक झाले. “हातात आलेले पीक एका रात्रीत संपले,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार बाबर यांनी शेतकऱ्यांना धीर देत शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. “शेतकरी संकटात असताना शासनाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. नुकसानग्रस्तांना तातडीची मदत आणि योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल. कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकसानग्रस्त बागांची पाहणी करताना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच महावितरण विभागाला कोसळलेले वीज पोल तातडीने उभारून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेशही देण्यात आले.
या दौऱ्यात जिल्हा परिषद बांधकाम सभापती पृथ्वीराज पाटील, दत्तात्रय पाटील, नगरसेवक अमरसिंह पाटील, युवासेना तालुकाप्रमुख मनोज नांगरे, रामचंद्र नांगरे, रावसाहेब सागर, मारुती हजारे, संतोष नांगरे, कृषी अधिकारी मारुती कौलगे, तलाठी विनायक पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
वादळात जनावरांचाही मृत्यू
आटपाडी शहर आणि परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जनावरांचेही मोठे नुकसान झाले. लिंगेवस्ती येथील संजय लिंगे यांची म्हैस आणि जैबून मलखान शेख यांची शेळी झाड कोसळल्याने दगावली. तसेच साठेनगर येथील रविराज मोतीराम लांडगे यांचा घोडा विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडला. या घटनेत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
याशिवाय २० ते २५ डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून शहरातील २० हून अधिक घरांची पत्रे उडाली, तर काही घरांच्या भिंती कोसळल्याने नागरिकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.