

Atpadi Meenakshi Patil Vice President
आटपाडी : आटपाडी नगरपंचायतीतील सत्ता-समीकरणांना कलाटणी देणाऱ्या नाट्यमय घडामोडींनंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मीनाक्षी मनोजकुमार पाटील यांची उपनगराध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाली. भाजपच्या ठाम पाठिंब्यामुळे ही निवड एकतर्फी ठरली.
नगरपंचायत निवडणुकीत भाजपकडे नगराध्यक्षसह ७ नगरसेवकांची बहुमताची ताकद आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) सर्वाधिक ८, तर तीर्थक्षेत्र आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे.
आज पिठासन अधिकारी नगराध्यक्ष उत्तम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. उपनगराध्यक्षपदासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मीनाक्षी पाटील आणि राष्ट्रवादीच्या संध्याराणी पाटील यांचे अर्ज दाखल झाल्याने निवडणूक होणार अशी चिन्हे होती.
दोन्ही बाजूंना ९-९ मतांचे संख्याबळ असल्याने ‘टाय’ची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, निर्णायक क्षणी नगराध्यक्षांचे मत तीर्थक्षेत्रकडे झुकणार हे स्पष्ट होताच राष्ट्रवादीने रणांगणातून माघार घेतली. आणि काही क्षणांतच पाटील यांची बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड निश्चित झाली.
निवडीनंतर स्वीकृत सदस्य पदासाठी भाजप गटनेते ऋषिकेश देशमुख यांनी केलेल्या शिफारशी नुसार लिंगायत समाजातील संगम डोंबे आणि तर शिवसेना गटनेते अमरसिंह पाटील यांनी केलेल्या शिफारशीनुसार लिंगायत समाजातील सोमेश्वर भिंगे आणि यांची निवड झाली.
निवडीनंतर उपनगराध्यक्ष मीनाक्षी मनोजकुमार पाटील समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी उपनगराध्यक्ष मीनाक्षी पाटील यांचा सत्कार केला.