

आष्टा : येथील मटण मार्केट ते मिरजवेस रोडवर बुधवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे एक महिला जागीच ठार झाली. तर 16 वर्षांचा एक लहान मुलगा जखमी झाला.आष्टा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
अनिता सुभाष माळी (वय 50, रा. चौमोट मळा, आष्टा)असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.तर वरद संतोष माळी (वय 16) असे जखमी मुलाचे नाव आहे. अर्जुन शामराव खोत (वय 40, रा. कुंभोज, जि. कोल्हापूर) असे संशयीत आरोपीचे नाव आहे.
याबाबत विजय अशोक माळी यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, विजय माळी यांचा पुतण्या वरद माळी हा आपली दुचाकी (क्र. एम.एच. 10 ईटी 3224) वरून चुलती अनिता माळी यांना घेऊन जात होता. यावेळी आरोपी अर्जुन खोत याने आपल्या ताब्यातील महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. एम.एच. 09 बीपी 1783)आणि ऊसाने भरलेली ट्रॉली (क्र.एम.एच.09 एफजे 3817) हयगयीने व अविचाराने चालवून मोटरसायकलला उजव्या बाजूने जोराची धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती की,तोल जाऊन वरद एका बाजूला पडला तर अनिता या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली पडल्या. ट्रॅक्टर ट्रॉलीचे मागील उजवे चाक अनिता माळी यांच्या डोक्यावरून गेले. यामध्ये त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या उडून त्या जागीच ठार झाल्या. वरद माळी हा देखील या अपघातात जखमी झाला आहे. आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी विजय माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक अर्जुन खोत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.