

शिराळा शहर : ग्रामीण भागातील शेतीपूरक व्यवसाय म्हणून गेल्या काही वर्षांत दुग्ध व्यवसायाकडे तरुणांचा कल वाढला आहे. अनेक बेरोजगार तरुणांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून हा व्यवसाय उभारला. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांपासून दुधाला अपेक्षित भाव न मिळणे आणि त्यातच पशुखाद्य, औषधे, दुभत्या जनावरांच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ यामुळे व्यवसाय अडचणीत सापडला आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर आले आहेत.
तालुक्यात सध्या गाय वर्ग 26 हजार 496, म्हैस वर्ग 45 हजार 898, तर शेळ्या-मेंढ्या 14 हजार 782 इतके पशुधन आहे. या पशुधनासाठी लागणाऱ्या खाद्याचा खर्च गेल्या काही महिन्यांत दुप्पट झाला आहे. याउलट गाईच्या दुधाचा भाव 35 रुपये, तर म्हशीच्या दुधाचा भाव 60 रुपये इतकाच आहे.
पूर्वी 800-900 रुपयांना मिळणारे खाद्य आता 1600 रुपयांवर पोहोचले आहे. सरकी पेंड 35 ते 42 रुपये, गोळी पेंड 55 ते 60 रुपये, खपरी पेंड 48 ते 50 रुपये, आटा 42 ते 45 रुपये किलो दराने विकला जात आहे. याउलट गाईच्या दुधाचा भाव 35 रुपये, तर म्हशीच्या दुधाचा भाव 60 रुपये इतकाच आहे. उत्पादन खर्च आणि उत्पन्न यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली असून व्यवसाय टिकवणे कठीण झाले आहे.