

कुपवाड : कुपवाड ते मिरज रस्त्यालगत असलेल्या एका कंपनीसमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात सोमवार, दि. 24 रोजी रात्री साडेआठ वाजता घडला. जखमीवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली आहे.
राहुल सुभाष कांबळे (वय 38, सध्या रा. शिवाजी कॉलनी, मिरज. मूळ गाव सिद्धेश्वर मंदिराजवळ, उपळावी, ता. तासगाव), तुषार अशोक पिसे (24, रा. मुजावर प्लॉट, कुपवाड) अशी मृतांची नावे आहेत, तर रेणू राजेंद्र शिंगे (65, रा. मुजावर प्लॉट, कुपवाड) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कुपवाड ते मिरज रस्त्यालगत असलेल्या एका कंपनीसमोरील रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. एका दुचाकीवर राहुल कांबळे, तर दुसऱ्या दुचाकीवर तुषार पिसे व रेणू शिंगे होते. (दोन्ही दुचाकींचे क्रमांक मिळू शकले नाहीत.) अपघातात गंभीर मार लागल्याने रक्तबंबाळ होऊन तिघेही रस्त्यावर पडले. अपघाताची माहिती मिळताच आयुष हेल्पलाईन टीम व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र दोन तरुणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर रेणू शिंगे यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.