सांगली ः शहरातील एका महाविद्यालयात शिकणार्या युवतीवर ओळखीचा आणि परिस्थितीचा फायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून तिला कॅफे, लॉजवर बोलावून लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित शाहिद इकबाल मुजावर (वय 19, रा. सम्राट व्यायाम मंडळाजवळ, सांगली) याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित युवती ही शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. पीडितेच्या परिस्थितीचा फायदा घेत शाहिद याने तिच्याशी जवळीक साधली. मार्च 2023 ते 7 ऑक्टोबर 2024 या कालावधीत तिला लग्नाचे आमिष दाखवत कॉलेज कॉर्नर येथील एका कॅफेमध्ये शरीरसंबंध ठेवले. तसेच तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओही घेतले. हे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला लॉजवर नेऊन अत्याचार केले. 7 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर रोडवरील एका लॉजमध्ये बोलावून त्याने जबरदस्तीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. या घटनेनंतर पीडित युवतीने संशयित शाहिद मुजावर याच्याविरुद्ध शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार बलात्कार, अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवस कोठडी सुनावण्यात आली.
काही महिन्यांपूर्वी शहरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आला होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी तीन कॅफेची तोडफोड केली होती. कॅफेमध्ये पार्टिशन घालून अवैध प्रकार सुरू होते. त्याला चाप लावण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली. आता आणखी एका युवतीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आल्याने कॅफे पुन्हा चर्चेत आले आहेत.