केज : बीडमधील माजलगाव तालुक्यातील घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा केज तालुक्यात अत्याचाराची घटना घडली. केजमधील एका गावात ४३ वर्षीय एका मूकबधीर महिलेवर नात्यातील एकाने अत्याचार केला. ही घटना सोमवारी (दि.७) दुपारी तीन वाजता घडली. याप्रकरणी पीडितेच्या चुलतीने दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबतची माहिती अशी, केज तालुक्यातील एका गावात एक विवाहित मूकबधीर महिला आपल्या आई-वडिलांबरोबर राहते. तिचे आई-वडील शेतमजुरीचे काम करत असून सोमवारी (दि. ७) सोयाबीनची कापणी करण्यासाठी ते दुसऱ्याच्या शेतात कामासाठी गेले होते. यादरम्यान ही महिला घरात एकटीच पाहून नात्यातील एका नराधमाने दुपारच्या सुमारास घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. ही बाब पीडितेच्या चुलतीच्या निदर्शनास येताच नराधम तेथून पसार झाला. त्यानंतर पिडीतेच्या चुलतीने दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात नात्यातील एका नराधमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरक्षक आनंद शिंदे हे पुढील तपास करत आहेत.