

जत :पुढारी वृत्तसेवा : अंकले (ता. जत) येथे सुवासनीच्या कार्यक्रमात दिलेल्या जेवणातून सुमारे २० जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. तुकाराम केशव ऐवळे यांच्या घरी बुधवारी सुवासिनीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात गोड पुरणपोळी व आमरसचे जेवण दिले होते. या जेवणानंतर २० जणांना उलट्या व जुलाबचा त्रास होऊ लागल्याने रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कवठेमंहकाळ येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. गुरुवारी दुपारी यातील चौघांची प्रकृती खालावल्याने शासकीय रुग्णालय मिरज येथे दाखल करण्यात आले आहे.
पुरणपोळीच्या जेवणातून विक्रम तुकाराम ऐवळे (वय ३१), लता तुकाराम ऐवळे (वय ४१), संपता कुंडलिक ऐवळे (वय ५५), प्रमिला तुकाराम ऐवळे (वय ३५), प्रसाद तुकाराम ऐवळे (वय ११), चैतन्य सोपान ऐवळे (वय २७), निवृत्ती पांडुरंग ऐवळे (वय ३५), पारूबाई पांडुरंग ऐवळे (वय ७०), साक्षी दादासाहेब ऐवळे (वय १६), समर्थ अनिल गेजगे (वय ६), सुरेखा अनिल गेजगे (वय २२), नंदाबाई वसंत गेजगे (वय ५५), सिताराम बाळू ऐवळे (वय ७०), राजाबाई आप्पा ऐवळे (वय ७५), अथर्व दादासाहेब ऐवळे (वय १८) यांना विषबाधा झाली आहे. सुरुवातीस काहींना मळमळ नंतर उलट्या व जुलाब सुरू झाला. बुधवारी रात्री उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय कवठेमंहकाळ येथे उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर अकरा वाजता उर्वरित बाधित व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी सकाळी चौघांची प्रकृती खालावल्याने मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.
हेही वाचा :