आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत देशमुख आणि पडळकर बंधूंच्या नेतृत्वाखाली भाजपने २५ पैकी १४ ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखले. बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार अनिल बाबर गटाचे तानाजीराव पाटील यांनी एकाकी लढत देत ८ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मात्र कोठेच यश मिळाले नाही.
आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज झाली. पहिल्या फेरीत पाच ग्रामपंचायतींवर कब्जा करत शिवसेनेने आघाडी घेतली. परंतु त्यानंतरच्या सर्व फेरीत दमदार कामगिरी करत भाजपने १४ ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला. भाजपने शिवसेनेच्या ताब्यातील यपावाडी, आवळाई, गळवेवाडी, पळसखेल, उंबरगाव, राजेवाडी, खरसुंडी, गोमेवाडी, पुजारवाडी (दिघंची) या ९ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. तर पडळकरवाडी, पारेकरवाडी, झरे, बाळेवाडी, तडवळे येथील सत्ता कायम राखली. शिवसेनेने कौठूळी, दिघंची, घाणंद, माळेवाडी, वलवण येथील सत्ता कायम राखत जांभुळणी, माळेवाडी या ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. हिवतडमध्ये भाजप पडळकर गटाच्या विरोधात भाजप देशमुख गट, सेना, रासपने झेंडा फडकवला. तर यपावाडी भाजप आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला मात देत सत्तांतर केले. कुरुंदवाडीची निवडणूक बिनविरोध झाली.
तालुक्यातील दिघंची येथे सेनेने भाजप आणि राष्ट्रवादीचे कडवे आवाहन परतवून लावत दणदणीत विजय मिळविला. शिवसेनेचे माजी सरपंच अमोल मोरे यांच्या पत्नी माधुरी मोरे, राष्ट्रवादीचे हणमंतराव देशमुख यांच्या पत्नी माजी सभापती जयमाला देशमुख आणि भाजपच्या वैशाली शिंदे यांच्यात अटीतटीची तिरंगी लढत झाली. पण तानाजीराव पाटील यांनी अमोल मोरे व सहकाऱ्यांच्या साथीने गड कायम राखला. खरसुंडी येथे सेना, भाजप आणि दोन्ही काँग्रेसमध्ये जोरदार तिरंगी लढत झाली. सेनेची सत्ता उलटवून भाजपच्या धोंडीराम इंगवले यांनी बाजी मारली. सदस्य पदासाठी निवडणूक लढत एकमेव अपक्ष उमेदवार राहुल गुरव देखील विजयी झाले. झरे येथे सरपंच पदाचा उमेदवार पळवण्यावरून चर्चेत आलेली निवडणूक जिंकत भाजपने सत्ता कायम राखली. गलाई बांधवांची जुगलबंदी ठरलेली कौठूळी येथील निवडणूक लक्षवेधी ठरली. सेनेच्या तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली वर्षाराणी भारत कदम यांनी भाजपच्या संगिता सुखदेव कदम यांच्यावर मात करत सत्तांतर केले.
हेही वाचा :